गणपतीसाठी कोकणात एसटीच्या 5220 जादा गाड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लाडक्या गणरायाच्या उत्सवासाठी कोकणात जाणाऱया चाकरमान्यांच्या सेवेत ‘लालपरी’ सज्ज झाली आहे. गौरी-गणपती सणासाठी यंदा एसटीच्या 5220 जादा गाड्या मुंबई, ठाणे आणि पालघरमधून कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिह्यात धावणार आहेत. 7 ते 25 सप्टेंबरदरम्यान मुंबई, ठाणे व पालघर विभागातील प्रमुख बस स्थानकांतून जादा गाडय़ा सुटणार असून त्यांचे आरक्षणही खुले केले आहे. एसटीने थेट आपल्या गावापर्यंत पोहोचता येणार असल्यामुळे मुंबई-ठाण्यातील हजारो गणेशभक्तांना एसटीच्या रूपात ‘बाप्पा’ पावला आहे.

गौरी-गणपती सण महिनाभरावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे मुंबई-ठाण्यातील कोकणी जनतेला गावी जाण्याचे वेध लागले आहेत. दरवर्षी लाखो गणेशभक्त कोकणात जातात. वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करीत मध्य रेल्वेने 246 जादा गाडय़ांची घोषणा केली आहे, तर पश्चिम रेल्वेनेही विशेष गाडय़ांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यापाठोपाठ एसटी महामंडळाने 5220 जादा गाडय़ा सोडणार असल्याचे जाहीर करून गणेशभक्तांना मोठी खूशखबर दिली आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी जादा गाडय़ांची घोषणा केली. जादा वाहतुकीच्या नियोजनासंदर्भात एसटी महामंडळाच्या मुख्यालयात आढावा बैठक घेऊन हा निर्णय जाहीर करण्यात आला. गणपती बाप्पा, कोकणातील रहिवासी आणि एसटी यांचे अतूट नाते आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही नफा-तोटय़ाचा विचार न करता गणेशभक्तांच्या सेवेसाठी एसटी सज्ज आहे, असे परिवहन मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले. जादा बसेसचे आरक्षण npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रवाशांना बसस्थानकांवर तसेच MSRTC Bus Reservation या अधिकृत मोबाईल अॅपद्वारेही आरक्षण करता येणार आहे.

खड्डय़ांचे काय?

मुंबई-गोवा महामार्गावर यंदाही खड्डय़ांचे साम्राज्य जैसे थे आहे. माणगाव, नागोठणे परिसरात अनेक भागांत रस्ता कमी आणि खड्डेच जास्त आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होण्याबाबत दिलेले आश्वासन खड्डय़ातच गेले आहे. त्यामुळे प्रवासी, वाहनधारक संतप्त प्रतिक्रिया नोंदवत आहेत. गणेशोत्सवापूर्वी खड्डे भरले जाणार की खड्डय़ांचे दणके सोसतच गाव गाठावे लागणार, असा प्रश्न गणेशभक्तांकडून उपस्थित केला जात आहे.

10 ऑगस्टपासून ग्रुप बुकिंग सुरू

अनेक गणेशभक्त एसटीच्या गाडय़ांचे गट आरक्षण करतात. त्यांच्या सोयीसाठी 10 ऑगस्टपासून गट आरक्षण सुरू केले जाणार आहे. किमान 40 प्रवाशांच्या ग्रुपसाठी 10 ऑगस्टपासून गट आरक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गट आरक्षणामध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना 50 टक्के सवलत, तर अमृत ज्येष्ठ नागरिकांना 100 टक्के भाडे सवलत लागू राहणार आहे.