
मुंबईतील मोकळ्या जागा ढापण्याचे सत्र भारतीय जनता पक्षाने सुरू केले आहे. मुंबईकरांना मोकळा श्वास घेता यावा म्हणून असलेली मैदाने भाजपा आमदार आणि ट्रस्टना फुकटात देण्यात आली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांत ती पुन्हा ताब्यात घ्यावीत अन्यथा रस्त्यावर उतरून थेट मुख्यमंत्र्यांवरच मोर्चा काढू, असा इशारा शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज दिला.
अंधेरी आणि जुहू येथील मोकळ्या मैदानाची आणि भूखंडांची 16 एकर जागा एका भाजपा आमदाराला तसेच केळवणी ट्रस्टला सरकारने दिली. त्याविरोधात आदित्य ठाकरे आक्रमक झाले असून ही मोकळी मैदाने वाचवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. भाजपाकडून होणाऱया या ढापाढापीविरोधात मोर्चा काढण्याचा इशारा आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी दिला होता. आज त्यांनी पुन्हा ट्विट करून यासंदर्भात मुंबईकरांना जागरूक केले. मुंबई आपली आहे, ती भाजपच्या बिल्डर कंत्राटदारांची होऊ द्यायची नाही. मुंबईतील मोकळी मैदाने आपण वाचवलीच पाहिजेत, अशी कळकळीची साद त्यांनी मुंबईकरांना घातली आहे. जेन-झीनी आंदोलन करून सरकारला झुकायला भाग पाडले म्हणून त्यांच्या खेळण्याचा जागा भाजपा ताब्यात घेते का, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
भाजप आमदार आणि ट्रस्टना दिलेली मैदाने मुख्यमंत्र्यांनी येत्या दोन दिवसांत पुन्हा परत घ्यावीत अन्यथा मुख्यमंत्र्यांवरच मोर्चा नेला जाईल, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी या ट्विटमध्ये पोस्ट केलेल्या व्हिडिओत दिला आहे. सर्व राजकीय पक्षांनी मुंबई वाचवण्यासाठी आपापसातील मतभेद दूर ठेवून, विचारधारा बाजूला ठेवून मुंबईसाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.






























































