
जर तुम्ही तुमचा स्मार्टफोन ईएमआयवर घेतला असेल आणि त्याचे हप्ते फेडायला 60 दिवसांचा उशीर केल्यास फोन लॉक होऊ शकतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) तशी परवानगी करदात्या बँका आणि वित्तीय संस्थांना दिली आहे. सुधारित नियमांची अंमलबजावणी 1 जानेवारी 2027 पासून लागू करण्यात येणार आहे.
आरबीआयने ग्राहक हिताचे अनेक नियमही घालून दिले आहेत. हप्ता थकल्यानंतर लगेचच कर्जदाता मोबाईल किंवा अन्य उपकरणे लॉक करू शकत नाही.
आरबीआयचे नवे नियम काय आहेत?
किमान 30 दिवसांचा उशीर झाल्यानंतर आणि संबंधित ग्राहकाला अधिकृत नोटीस बजावल्यानंतरच बँकांना कारवाई करण्याचे अधिकार आरबीआयने दिले आहेत.
30-60 दिवसांचा उशीर झाल्यास कर्जदाता टप्प्या-टप्प्याने उपकरणावरील काही सुविधा मर्यादित स्वरूपात वापरू शकतो. या दरम्यान ग्राहकाची आउैटगोइंग सुविधा बंद करता येणार नाही.
60 दिवसांहून अधिक काळ हप्ता थकल्यानंतर कर्ज करारानुसार संबंधित संस्थेला संपूर्ण निर्बंध लागू करता येतील.
मोबाईल फोनवरील निर्बंधांमुळे ग्राहकाच्या रोजगार किंवा व्यवसायाशी संबंधित कामांमध्ये अडथळा येणार नाही याची जबाबदारी वित्तीय संस्थांवर असेल, असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे.
ग्राहकाने थकीत रक्कम भरल्यास एका तासाच्या आत मोबाईलवरील सर्व निर्बंध हटवणे या संस्थांना बंधनकारक आहे. अन्यथा संबंधित संस्थेने ग्राहकाला प्रति तास 250 रु. नुकसानभरपाई देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
ग्राहकाच्या फोनमधील खासगी माहितीत हस्तक्षेप करण्यास आरबीआयेने सक्त मनाई केली आहे.





























































