महापालिका मुख्यालय, मेट्रो स्थानके बॉम्बने उडवून देण्याची धमकी; सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महापालिका मुख्यालयासह मुंबईतील शाळा, मेट्रो स्थानके तसेच शेअर बाजार इमारत  बॉम्बस्फोटाने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल महापौर कार्यालयाला आला आहे. यामुळे खळबळ उडाली असून सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे.

15 ऑगस्टपूर्वी मुंबईतील महापौर कार्यालयासह महत्त्वाची ठिकाणे लक्ष्य करण्याची धमकी ई-मेलमधून देण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी सहभागी होऊ नये तसेच शाळा आणि मेट्रोतून प्रवास करू नये, असा मजकूर ई-मेलमध्ये लिहिलेला आहे. मुंबईतील घाटकोपर, मरोळ नाका, अंधेरी, गुंदवली ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मेट्रो मार्गाचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच शेअर बाजाराला लक्ष्य करण्याचा उल्लेख आहे. ई-मेलच्या शेवटी खलिस्तान नॅशनल आर्मी आणि बब्बर खालसा या नावांचा उल्लेख आहे.

महापौरांना यापूर्वीही दोन वेळा धमकीचे ई-मेल आले होते. शुक्रवारी सकाळी आलेल्या धमकीनंतर महापालिका प्रशासनाने तातडीने मुंबई पोलिसांना माहिती दिली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. धमकीचा ई-मेल नेमका कुठून पाठवण्यात आला, त्यामागे कोण आहे व त्याचा उद्देश काय आहे, याचा तपास मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाकडून सुरू आहे. प्राथमिक तपासात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नसली तरी खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांनी या ई-मेलची गंभीर दखल घेत बॉम्बशोधक व नाशक पथक, श्वान पथक आणि अन्य सुरक्षा यंत्रणांना घटनास्थळी पाचारण केले. पालिका मुख्यालय, महापौर कार्यालय आणि मेट्रो परिसरातील प्रत्येक भागाची बारकाईने तपासणी करण्यात आली. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत संपूर्ण परिसरात अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली.