
>> पराग खोत
मराठी रंगभूमीवर काही नाटके ही केवळ यशस्वी ठरत नाहीत, तर ती काळाच्या कसोटीवर टिकणारी ठरतात. डॉ. विवेक बेळे लिखित ‘काटकोन त्रिकोण’ हे त्यापैकीच एक. काही वर्षांपूर्वी ‘महाराष्ट्र कल्चरल सेंटर’ने गिरीश जोशी यांच्या दिग्दर्शनाखाली रंगभूमीवर आणलेल्या या नाटकाने प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडले होते. डॉ. मोहन आगाशे यांच्या समर्थ अभिनयामुळे या नाटकाला एक वेगळी उंची मिळाली होती. संदेश कुलकर्णी आणि केतकी थत्ते यांनी तितकीच सशक्त साथ दिली होती. आता दिग्दर्शक अजित भुरे यांनी शरद पोंक्षे, सुयश टिळक आणि प्रियांका तेंडोलकर या नव्या चमूसह हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणले आहे. नव्या पिढीसमोर आजही हे नाटक तितक्याच ताकदीने उभे राहते, हेच त्याच्या लेखनाचे मोठेपण आहे.
डॉ. विवेक बेळे यांच्या नाटकांची एक स्वतंत्र ओळख आहे. वेगळे आकृतीबंध आणि संवादाची खास ‘बेळे स्टाईल’ त्यांच्या अनेक नाटकांमधून रसिकांपर्यंत पोहोचलेली आहेच. त्यांची नाटके नातेसंबंधांतील भावनिक गुंतागुंत मांडतात; पण त्याचा पाया केवळ भावनांवर नसतो. त्यामागे तर्क असतो, विचारांची शिस्त असते आणि मानवी मनाचा सखोल अभ्यास असतो. ‘अ फेअर डील’, ‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’, ‘माकडाच्या हाती शँपेन’, ‘पॉपकॉर्न’ किंवा ‘नेव्हर माइंड’ या नाटकांप्रमाणेच ‘काटकोन त्रिकोण’ही मानवी नात्यांकडे वेगळ्या दृष्टीने पाहणारी बुद्धिमान कलाकृती आहे. त्यांच्या लेखनातील साधे वाटणारे दुवे, त्यामधील तर्कशुद्धता आणि शेवटच्या टप्प्यावर होणारा अनपेक्षित उलगडा यात प्रेक्षक गुंतून जातात. चमकदार आणि तितकेच टोकदार संवाद हे डॉ. बेळे यांचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. या नाटकाच्या संहितेची ताकद एवढी होती की यावर आधारित ‘आपला माणूस’ हा मराठी चित्रपट २०१८ साली दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी सुमित राघवन, इरावती हर्षे आणि नाना पाटेकर यांना घेऊन काढला होता.
‘काटकोन त्रिकोण’ या नाटकाची कल्पनाच अत्यंत वेगळी आहे. भूमितीतील त्रिकोण हा केवळ आकृतीबंध न राहता तो एका कुटुंबातील तीन व्यक्तींच्या नात्यांचे प्रतीक होऊन येतो. सासरा, मुलगा आणि सून या तिघांच्या विचारांचे कोन वेगवेगळे आहेत. हे कोन कधी जवळ येतात, कधी दूर जातात आणि कधी काटकोन त्रिकोण तयार करतात. या त्रिकोणातील प्रत्येक बाजू स्वतःला योग्य समजते; पण प्रमेय सुटत नाही. डॉ. बेळे या संपूर्ण कौटुंबिक संघर्षाला गणिती भाषेत मांडतात आणि हेच या नाटकाचे वेगळेपण ठरते.
कथानक अत्यंत ओळखीचे आहे. नव्या पिढीचे प्रतिनिधी असणारे मुलगा आणि सून दोघेही नोकरी करणारे. आई गेलेली, त्यांच्यासोबत राहणारे वृद्ध वडील, आधुनिक जीवनशैली, कर्ज काढून सुखसोयी उपभोगण्याची मानसिकता आणि वेळेअभावी हरवत जाणारे संवाद. सून गणिताची प्राध्यापिका असल्यामुळे घरातील प्रत्येक प्रश्न ती समीकरणांप्रमाणे सोडवण्याचा प्रयत्न करते. अशा वेळी एका घटनेमुळे इन्स्पेक्टर बापट यांचा या घरात प्रवेश होतो आणि सगळा खेळ सुरू होतो. सुरुवातीला हा भाग प्रेक्षकांना खळखळून हसवतो. पण हळूहळू हेच गणित मानवी भावनांसमोर कसे अपुरे पडते, याची जाणीव होत जाते. विनोदातून गंभीरतेकडे होणारा हा प्रवास अत्यंत सहज घडतो.
नाटकाचा सर्वात प्रभावी पैलू म्हणजे त्यात खेळवलेले रहस्य. सुरुवातीला साध्या वाटणाऱ्या संवादांमधून लेखक इतक्या खुबीने धागेदोरे पेरत जातो की शेवटचा उलगडा करताना प्रेक्षक अक्षरशः थक्क होतो. डॉ. बेळे यांच्या लेखनाची ही खासियत पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवते. संवादांमध्ये कोठेही कृत्रिम नाटकीयता नाही; उलट साधेपणातून निर्माण होणारी अस्वस्थता अधिक परिणामकारक ठरते.
आजच्या समाजातील वृद्धांच्या प्रश्नांवर अनेक चर्चा होतात. वृद्धाश्रम, एकाकीपण, पिढ्यांमधील संवादाचा अभाव या विषयांवर सतत भाष्य केले जाते. ‘काटकोन त्रिकोण’ या प्रश्नांना उपदेशात्मक पद्धतीने हाताळत नाही. उलट प्रत्येक पात्राची बाजू समजून घेत प्रेक्षकांनाच विचार करायला भाग पाडते. आधुनिक विचारांची सून चुकीची नाही, वृद्ध वडिलांची अपेक्षा अवास्तव नाही आणि दोघांमध्ये अडकलेला मुलगाही दोषी नाही. म्हणूनच हे नाटक कोणाच्याही बाजूने उभे राहत नाही; ते फक्त नात्यांतील विसंवादाचे गणित मांडते.
पूर्वी डॉ. मोहन आगाशे यांनी साकारलेला ‘आबा’ हा या नाटकाचा आत्मा होता. आता त्या भूमिकेची जबाबदारी शरद पोंक्षे यांनी समर्थपणे स्वीकारली आहे. त्यांच्या अनुभवामुळे आबांच्या व्यक्तिमत्त्वातील हतबलता, स्वाभिमान आणि भावनिक एकाकीपण प्रभावीपणे व्यक्त होते. सुयश टिळक मुलाच्या भूमिकेत संयम राखतो. दोन टोकांच्या विचारांमध्ये अडकलेल्या व्यक्तीची त्याने केलेली मांडणी विश्वासार्ह वाटते. प्रियांका तेंडोलकर आधुनिक, बुद्धिमान आणि आत्मविश्वासू सुनेची भूमिका अत्यंत सहजतेने साकारते. तिच्या अभिनयामुळे ते पात्र केवळ ठाम राहत नाही, तर त्यामागची संवेदनशीलताही प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. अजित भुरे यांनी मूळ संहितेचा आत्मा जपत नव्या पिढीच्या अभिनय शैलीशी सुसंगत अशी मांडणी केली आहे. त्यामुळे नाटकाला नवा वेग आणि ताजेपणा लाभतो.
आज मोबाईल, सोशल मीडिया आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात माणसांमधील संवाद कमी होत चालला आहे. अशा काळात ‘काटकोन त्रिकोण’ पुन्हा रंगभूमीवर येणे हे केवळ जुन्या यशस्वी नाटकाचे पुनरुज्जीवन नाही, तर आजच्या समाजालाच विचारलेला एक अस्वस्थ करणारा प्रश्न आहे. गणितातील प्रत्येक प्रमेयाला उत्तर असते; पण नात्यांच्या प्रमेयाला उत्तर शोधण्यासाठी केवळ तर्क पुरेसा नसतो, त्याला मायेची आणि संवादाची जोड लागते. ही जाणीव करून देणारे ‘काटकोन त्रिकोण’ आजही तितकेच रिलेटेबल ठरते. म्हणूनच हे नाटक केवळ पाहण्याची नव्हे, तर जाणून घेण्याची आणि अनुभवण्याची एक वैचारिक गोष्ट आहे.
-
लेखक: डॉ. विवेक बेळे
-
दिग्दर्शक: अजित भुरे
-
कलाकार: सुयश टिळक, प्रियांका तेंडोलकर आणि शरद पोंक्षे
-
नेपथ्य: प्रदीप मुळ्ये
-
प्रकाश योजना: शीतल तळपदे
-
संगीत: साई-पियूष
-
सूत्रधार: नितीन नाईक
-
छायाचित्र सौजन्य: संजय पेठे




























































