
हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यदिनाचा यंदा अमेरिकेत विशेष गौरव होणार आहे. मॅसॅच्युसेट्सच्या गव्हर्नर मौरा हिली यांनी 15 ऑगस्ट 2026 हा दिवस ‘भारत दिन’ (India Day) म्हणून घोषित केला आहे. या घोषणेद्वारे मॅसॅच्युसेट्समधील हिंदुस्थानी-अमेरिकन समुदायाच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि नागरी क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यात आला आहे.
गव्हर्नर हिली यांनी 1 ऑगस्टला जारी केलेल्या घोषणेत हिंदुस्थानी समुदायाच्या योगदानाचा विशेष उल्लेख केला. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमांसोबतच समाजसेवा, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि नागरी सहभाग वाढवण्यासाठी विविध हिंदुस्थानी संस्था आणि कार्यकर्ते करत असलेल्या कामाचेही त्यांनी कौतुक केले.
मॅसॅच्युसेट्सची राजधानी बोस्टनमध्येही महापौर मिशेल वू यांनी 15 ऑगस्ट हा दिवस ‘भारत दिन’ म्हणून घोषित केला आहे. बोस्टनमध्ये हिंदुस्थानी समुदायाच्या वाढत्या प्रभावाची दखल घेत ही घोषणा करण्यात आली आहे. बोस्टन शहराने यापूर्वीही हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यदिनाची अधिकृत दखल घेतली आहे. असे वृत्त पीटीआयने दिले आहे. हिंदुस्थान -अमेरिका संबंधांच्या पार्श्वभूमीवर बोस्टनमध्ये यंदा आणखी एक महत्त्वाचा भारतीय संदर्भ पाहायला मिळाला. अमेरिकेच्या 250व्या स्वातंत्र्यवर्षानिमित्त आयोजित सेल बोस्टन 250 मध्ये भारतीय नौदलाचे प्रशिक्षण जहाज आयएनएस सुदर्शिनी सहभागी झाले होते. या जहाजाने बोस्टन हार्बरमध्ये भारतीय तिरंगा फडकवत परेड आॅफ सेल्स मध्ये सहभाग घेतला.
15 ऑगस्ट 2026 रोजी भारताच्या स्वातंत्र्याला 79 वर्षे पूर्ण होत आहेत. 1947 मध्ये ब्रिटिश वसाहतवादी राजवटीतून भारत स्वतंत्र झाला. या ऐतिहासिक दिवसाने जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या प्रवासाची पायाभरणी केली, असे मॅसॅच्युसेट्सच्या घोषणेत नमूद करण्यात आले आहे. घोषणेत हिंदुस्थानच्या सांस्कृतिक विविधतेचाही विशेष उल्लेख करण्यात आला आहे. विविध धर्म, भाषा, परंपरा, रीतिरिवाज, खाद्यसंस्कृती आणि जीवनशैली असूनही भारताने एकात्मता टिकवून ठेवली आहे. ही विविधतेतील एकता हिंदुस्थानच्या वैशिष्ट्यपूर्ण ओळखीचा भाग असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
मॅसॅच्युसेट्समधील हिंदुस्थानी-अमेरिकन समुदायाने वैद्यकशास्त्र, विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, व्यवसाय आणि जनसेवा अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या योगदानामुळे राज्याचे सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक जीवन अधिक समृद्ध झाले असल्याचे गव्हर्नर हिली यांच्या घोषणेत म्हटले आहे.





























































