
‘बिग बॉस’च्या चाहत्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली असून लोकप्रिय रिॲलिटी शोच्या निर्मात्यांनी नवीन सीझनची घोषणा केली आहे. सुपरस्टार सलमान खानचा एक नवीन आणि औत्सुक्य वाढवणारा प्रोमो समोर आला असून, याद्वारे शोच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या नवीन सीझनमध्ये एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.
जिओ हॉटस्टार आणि कलर्स वाहिनीने ‘बिग बॉस’ हिंदी सीझन 20 चा पहिला टीझर रिलीज केला आहे, ज्यामध्ये सलमान खान नेहमीच्या अंदाजात सूत्रसंचालक म्हणून परतला आहे. या प्रोमोची सुरुवात सलमान खानच्या घोड्यावरील दमदार प्रवेशाने होते. याद्वारे शोमध्ये एका मोठ्या ट्विस्टचे संकेत देण्यात आले आहेत. ‘करण-अर्जुन’ जोडीची झलक दाखवत प्रोमोमध्ये सलमान खान म्हणतो की, ‘करण अर्जुनमध्ये जे घडलं, तेच बिग बॉसमध्ये पुन्हा घडेल.’ निर्मात्यांनी या व्हिडिओला ‘एकापेक्षा दोघे बरे’ असे कॅप्शन दिले असून, हा शो येत्या 6 सप्टेंबरपासून जिओ हॉटस्टार आणि कलर्सवर प्रसारित होणार असल्याचे जाहीर केले आहे.
View this post on Instagram
हा आगामी सीझन 6 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून जिओ हॉटस्टारवर त्याचे लाइव्ह स्ट्रिमिंग होईल आणि कलर्स टीव्हीवर प्रसारण केले जाईल. मात्र, या सीझनमधील स्पर्धकांच्या नावांची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. आता या नव्या सीझनमध्ये कोणते चेहरे झळकणार आणि ‘करण-अर्जुन’ ट्विस्ट नेमकं काय असणार, हे पाहण्यासाठी चाहते कमालीचे उत्सुक आहेत.

























































