
>> रणजित मिश्रा
योग्य टर्म इन्शुरन्स कव्हर ठरवण्यासाठी वार्षिक उत्पन्नाच्या 10 ते 15 पट हा एक सामान्य नियम मानला जातो. पण, ह्युमन लाईफ व्हॅल्यू (HLV) ही पद्धत त्यापेक्षा जास्त प्रभावी आहे. ही पद्धत कुटुंबातील कमावत्या व्यक्तीच्या आर्थिक मूल्यावर लक्ष केंद्रित करते. भविष्यात त्यांच्या आर्थिक मदतीची जागा घेण्यासाठी किती उत्पन्नाची गरज लागेल, हे यातून कळतं.
व्यवहारात सांगायचं तर, तुमची सध्याची कमाई, कुटुंबाचा खर्च, जुनी देणी, मुलांचं शिक्षण यांसारखी ध्येय आणि कुटुंबाला किती वर्षं पैशांची गरज आहे, याचा विचार करणं गरजेचं आहे. फक्त मोठी रक्कम मिळवणं हा उद्देश नसून कुटुंबाला आपली जीवनशैली आणि ध्येय टिकवता यावीत, हे महत्त्वाचं आहे.
लाईफ कव्हरची रक्कम अशी हवी की, ज्यामुळे कमावत्या व्यक्तीच्या दैनंदिन खर्चाची कमतरता भरून निघेल. सोबतच कर्जाचा भार कुटुंबावर पडणार नाही आणि भविष्यातील महत्त्वाची स्वप्नं पूर्ण होतील, याचीही काळजी घेता येईल.
कुटुंबाला, विशेषतः लहान मुलं किंवा कमावती नसलेली माणसं असतील तर किती काळ आर्थिक मदतीची गरज आहे, याचा विचार व्हायला हवा. महागाई हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे, कारण आरोग्य, शिक्षण आणि घरखर्च भविष्यात वाढणारच आहेत. एक योग्य विमा रक्कम कुटुंबाच्या तातडीच्या गरजा भागवून त्यांना आपली ध्येय गाठण्यासाठी आत्मविश्वास देऊ शकते.
आयुष्याच्या प्रत्येक महत्त्वाच्या वळणावर टर्म इन्शुरन्सचा आढावा घेतला पाहिजे. कारण काळानुसार जबाबदाऱया बदलतात. लग्न, मूल होणं, गृहकर्ज घेणं किंवा आई-वडिलांची जबाबदारी यांसारख्या गोष्टींमुळे जास्त विम्याची गरज भासू शकते. जर तुम्ही वेळेवर विम्याचा आढावा घेतला नाही, तर गरज पडल्यावर तो अपुरा पडू शकतो. इन्शुरन्स प्लॅनिंग हे सतत चालणारं काम आहे, जे तुमच्या बदलत्या गरजा आणि आर्थिक प्राधान्यांनुसार बदलायला हवं.






























































