Ratnagiri News – जुनी प्रकरणे वेळेत निकाली न काढल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार; जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी, समस्या या स्थानिक स्तरावरच सुटायला हव्या. त्यासाठी अन्य विभागांची समन्वय साधून हे अर्ज निकालात निघायला हवे. अद्यापही जुनी प्रकरणे प्रलंबित दिसून येत आहेत. ती जर वेळेत निकाली न काढल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिला.

कारवांचीवाडी आदर्श वसाहत येथे बांधण्यात येत असणाऱ्या अपार्टमेंटबाबत आलेल्या स्थळपाहणी अहवालवरुन तात्काळ निर्णय घ्यावा. विकासक नियम पाळत नसेल तर त्याबाबत योग्य आदेश द्यावेत, अशी निर्देश जिल्हाधिकारी जिंदल यांनी दिले. पाणंद शिवार रस्ता, सिमांकन, वहीवाटीच्या रस्त्यावरील अतिक्रमण अशा विषयांवर तहसिलदार, प्रांत, भूमिअभिलेख या विभागांनी गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. 15 दिवसात आलेल्या अर्जांवर निर्णय घ्यावा. मागील प्रलंबित अर्जांबाबतही जिल्हाधिकारी जिंदल यांनी आढावा घेतला. ते म्हणाले, एप्रिलपासूनचे अर्ज अद्यापही प्रलंबित दिसत आहेत, ही बाब योग्य नाही. विहीत वेळेत आलेले अर्ज तक्रारी निकालात निघायला हवेत, अन्यथा संबंधितांवर कारवाई केली जाईल.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन झाला. यावेळी अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, भूमिअभिलेख अधिक्षक सचिन इंगळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, जिल्हा उपनिबंधक राम कुलकर्णी, पोलीस उपअधिक्षक निलेश माईनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील आदी उपस्थित होते.