
शिक्षण मंत्र्यांच्या अकार्यक्षमतेविरुद्ध तरुणाई रस्त्यावर आली तशीच एक दिवस गृहमंत्र्यांच्या नालायकीविरोधातही ती रस्यावर उतरून राजीनामा मागेल. जातीय विद्वेषाची आग लावणे, हिंदू-मुसलमान यांच्यात तणाव निर्माण करून निवडणुका जिंकणे हेच सध्या गृहमंत्र्यांचे मुख्य काम बनले आहे. त्यांना विरोधकांची फोडाफोड करता येते, पण दहशतवाद्यांचा बीमोड करता येत नसेल तर त्यांचा देशाला उपयोग नाही. कुलगाम येथील दहशतवादी हल्ल्याने गृहमंत्री शहांच्या राष्ट्रभक्ती आणि कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कश्मीरात आर.डी.एक्स, बंदुका, पैसा, अतिरेकी येतात कोठून? अमित शहा, राजीनामा द्या! आता अतीच झाले!!
भारताच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते गृहमंत्री अमित शहा व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पुण्यात ‘पुरस्कार पुरस्कार’ खेळत असताना जम्मू-कश्मीर पुन्हा दहशतवादी हल्ल्याने हादरले आहे. दक्षिण कश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील केल्लम परिसरात दहशतवाद्यांनी बिगर कश्मिरी मजुरांवर हल्ला केला. त्यात दोन मजुरांचा बळी गेला. हे दोन्ही मजूर छत्तीसगडचे होते. वीटभट्टीवर काम करत होते. लष्कर-ए-तोयबाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. देशाचे गृहमंत्री ‘पुरस्कार पुरस्कार’ खेळातून बाहेर आले असतील तर या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी ते स्वीकारणार आहेत काय? गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्यासाठी संसदेत गदारोळ माजला आहे. देशभरातून त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू आहे. ‘जंतर मंतर’वरील पेपरफुटीविरुद्धचे आंदोलन त्यांना अजिबात हाताळता आले नाही. उलट आंदोलन चिरडण्यासाठी त्यांनी पाशवी बळाचा वापर पोलिसांना करायला लावला, पॅलेट गन्स वापरल्या. जणू काही न्याय्य हक्कांसाठी लढणारी ही मुले दहशतवादी आहेत. आता थेट दहशतवादी कश्मीरात घुसून, निरपराध्यांना ठार करून गायब झाले. हे गृहमंत्री अमित शहांचे अपयश आहे. या मजुरांना त्यांचे नाव आणि धर्म विचारून मारले असे समोर आले. त्यामुळे हा हिंदुत्वावरही हल्ला आहे. अजित डोवाल हे देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. या महाशयांना प्रतिष्ठत ‘टिळक’ पुरस्कार देण्यात आला व तो गृहमंत्री शहांच्या हस्ते दिला. या दोघांवर राष्ट्रीय सुरक्षेची जबाबदारी आहे. त्यामुळे कश्मीरमधील हल्ल्यामुळे दोघांचे कर्तृत्व उघडे पडले आहे. नोटाबंदीमुळे कश्मीरातील दहशतवादाचे कंबरडे मोडेल, बनावट नोटा छापल्या जाणार नाहीत असा दावा मोदी-शहा व त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवाल यांनी केला होता, पण कश्मीरातील अशांतता व असंतोष कायम आहे आणि
भूमिगत अतिरेकी
अचानक बाहेर येऊन हल्ले करून पसार होतात. 370 कलम हटवल्याने कश्मीरातील हिंसक, फुटीरतावादी शक्तींचा बीमोड होईल असे भाषण गृहमंत्री शहांनी तेव्हा संसदेत ठोकले होते. प्रत्यक्षात हिंसा मधेच उफाळून येते व रक्तपाताचा उद्रेक होतो. याची जबाबदारी कोण घेणार? की ‘जंतर मंतर’वरील आंदोलकांना न मागता ‘माफ’ करणारे मोदी यांनी दहशतवाद्यांनाही माफी दिली आहे? कुलगाममधील हल्ल्यात दोन मजूर ठार झाले म्हणून सरकार ही बाब गांभीर्याने घेताना दिसत नाही. माणसे किती मरतात, यावर सरकारचे गांभीर्य ठरणार आहे काय? पुलवामामध्ये 40 जवानांची आरडीएक्स बॉम्बस्फोटांत हत्या करण्यात आली तेव्हाही सरकार गंभीर नव्हते. पंतप्रधान जिम कॉर्बेटच्या जंगलात सफारीचा आनंद लुटत होते. पहलगाम येथे तर 26 हिंदू पर्यटकांची निर्घृण हत्या केली. अतिरेकी एके-47 बंदुका घेऊन आले व पर्यटकांना मारून निघून गेले. या दोन्ही हत्याकांडांची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री अमित शहा व अजित डोवाल यांनी तेव्हाच राजीनामा द्यायला हवा होता. ते राजीनामा देण्यास तयार नव्हते तर पंतप्रधान मोदींनी त्यांना हाकलून द्यायला पाहिजे होते. शहा यांच्या कारकीर्दीत शंभरावर लोकांना नाहक मरण पत्करावे लागले. शहा स्वतः पन्नास सुरक्षा गाडय़ांच्या ताफ्यात वावरत आहेत. ते दिल्लीत राहतात त्या परिसरातील कृष्ण मेनन रोड, सुनहरी बाग लेन, संसद मार्ग असे चार-पाच रस्ते एक-दोन किलोमीटरपर्यंत जनतेसाठी बंद केले आहेत. हजारावर सशस्त्र बलाचे जवान त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. तरीही ते घाबरलेले आहेत. संसदेतही येत नाहीत. अशा माणसाकडून देशाची सुरक्षा कशी होणार? मणिपूर पेटलेले आहे. तेथील हिंसा यांना थांबवता येत नाही. भररस्त्यावर महिलांची नग्न परेड काढली जाते व अमित शहा
एका बेधुंद अवस्थेत
आमदार-खासदार विकत घेण्यात दंग असतात. पुन्हा सरदार पटेलांच्या तसबिरीखाली बसून लोकांना धमक्या देतात. हे आता फार काळ चालणार नाही. शिक्षण मंत्र्यांच्या अकार्यक्षमतेविरुद्ध तरुणाई रस्त्यावर आली तशीच एक दिवस गृहमंत्र्यांच्या नालायकीविरोधातही ती रस्यावर उतरून राजीनामा मागेल. जातीय विद्वेषाची आग लावणे, हिंदू-मुसलमान यांच्यात तणाव निर्माण करून निवडणुका जिंकणे हेच सध्या गृहमंत्र्यांचे मुख्य काम बनले आहे. त्यांना विरोधकांची फोडाफोड करता येते, पण दहशतवाद्यांचा बीमोड करता येत नसेल तर त्यांचा देशाला उपयोग नाही. कुलगाम येथील दहशतवादी हल्ल्याने गृहमंत्री शहांच्या राष्ट्रभक्ती आणि कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अमित शहा हे पाकव्याप्त कश्मीर परत भारतात आणण्याच्या वल्गना करत असतात, पण भारताच्या कश्मीरमधील जनतेचे रक्षण ते करू शकत नाहीत. मग गृहमंत्री म्हणून छातीत हवा भरून मिरवता कशाला? कश्मीरातील हिंदू पंडितांची घर वापसी अद्याप झाली नाही तरीही हे स्वतःला हिंदू हितरक्षक मानतात. पुन्हा राममंदिराच्या दानपेट्या लुटल्या जात आहेत त्या वेगळ्या. हे सर्व गृहमंत्री शहांच्या नाकर्तेपणामुळे घडत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून झुंडशाही करणे यालाच ते राज्य करणे असे समजत असतील तर त्यांच्या पायाखालची सतरंजी ओढण्यासाठी जनता जनार्दन आता सज्ज आहे. ‘जंतर मंतर’वर जनतेच्या मनातला नरसिंह उफाळून बाहेर आला. अमित शहा म्हणजे कोणी धुरंधर नाहीत. विरोधी पक्ष फोडण्याची त्यांची ‘धुरंधरगिरी’ सुरू असताना कश्मीरात दहशतवादी हल्ला झाला. कश्मीरात आर.डी.एक्स, बंदुका, पैसा, अतिरेकी येतात कोठून? अमित शहा, राजीनामा द्या! आता अतीच झाले!!






























































