
<< नीलेश कुलकर्णी
[email protected]
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे पहिल्या आठवड्याचे कामकाज गदारोळामुळे एकही दिवस पूर्ण क्षमतेने चालू शकले नाही. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पॅलेट गनने हल्ला करणाऱ्याचे आदेश देणाऱ्या गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत निवेदन द्यावे, अशी विरोधकांची मागणी आहे. गृहमंत्री संसद भवनात बैठका घेत आहेत. मात्र सभागृहात निवेदन करण्याचे धैर्य त्यांनी अद्याप दाखविलेले नाही. शहा यांनी सभागृहांत निवेदन केले तर कामकाज सुरळीतपणे पार पडेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा या दोघांनी हा तिढा सोडवणे देशासाठी गरजेचे आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे पहिल्या आठवड्याचे कामकाज संपले तरी अनेक महत्त्वाची विधेयके प्रलंबित आहेत. पेपरफुटी प्रतिबंधक विधेयक, वंदे मातरम् मान-अवमान विधेयक तसेच जन्म-मृत्यू नोंदीसंदर्भातले विधेयक अशी तीन विधेयके कशीबशी मंजूर करण्यात सरकारला यश आले. या तिन्ही विधेयकांवर सरकार पक्षाकडून उत्तर देण्याची नैतिक व संसदीय जबाबदारी ही पंतप्रधान व गृहमंत्र्यांची असते. मात्र हे दोघेही ‘लापता’ असल्याने संसदेचे कामकाज ठप्प आहे. मोदी-शहा यांनी ‘लापतागंज’ थांबवले तर कामकाज नक्कीच सुरळितपणे पार पडेल.
संसदेचे मान्सून सत्र गोंधळामुळे पाण्यात गेले तर त्याला जबाबदार सरकारची आडमुठी भूमिका ठरेल. जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर निर्दयी हल्ला केला गेला. त्याची जबाबदारी घेण्यापासून सरकार पक्ष पळ काढत आहे. बारा वर्षांनंतर ‘हम करे सो कायदा’ करणारे सरकार विद्यार्थ्यांपुढे झुकले. या विद्यार्थी लढ्यापासून प्रेरणा घेत विरोधकांनी संसदेत सरकारला गुडघे टेकवण्यास भाग पाडले. गोळीबाराचे आदेश जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक देत असतात, असा लंगडा युक्तीवाद भाजपचे नेते करताना दिसले. मात्र याच भाजपने अयोध्येत कारसेवकांना गोळ्या घातल्या म्हणून त्यावेळचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुलायमसिंग यांना मुल्ला मुलायम ठरवत दुगाण्या झाडल्या होत्या. मात्र आता तेच भाजपवाले अमित शहा यांचा गोळीबाराच्या आदेशाशी संबंध नाही, असा कांगावा करत आहेत. हे प्रकरण शहा यांच्या अंगाशी येणार आहे. त्यामुळे त्यांना वाचविण्यासाठी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची आहुती देण्याची सरकारची मानसिकता दिसत आहे. त्यामुळेच ‘वन नेशन वन इलेक्शन’चा गाजावाजा करणाऱ्या सरकारने सध्याच्या अधिवेशनात हे विधेयक न आणण्याचा निर्णय घेऊन यासंदर्भात नेमण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीला (जेपीसी) मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. एकंदरीतच केंद्र सरकार बॅकफूटवर आहे. घाबरलेले आहे. हे सरकार सोमवारी काय भूमिका घेते, यावर पावसाळी अधिवेशनाचे भवितव्य अवलंबून असेल.
परिवारातील ‘जेन झी’चे काय?
जंतर मंतरवर आंदोलन करून मोदी सरकारच्या तख्ताला बारा वर्षांत पहिल्यांदाच जबरदस्त हादरा दिलेल्या विद्यार्थ्यांची भाजप समर्थकांनी मोठी टवाळी चालवली आहे. या विद्यार्थ्यांना येनकेन प्रकारेण बदनाम करण्यासाठी सरकारी यंत्रणा व भाजपचा आयटी सेल कामाला लागला आहे. या आंदोलनात पाकिस्तानी घुसले आहेत इथपासून आंदोलनात सगळे नशेडी-गंजेडी, वाया गेलेले लोक आहेत, असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाने करून पाहिला. मात्र आता या अतिउत्साही मंडळींना त्यांच्या पक्षातील आमदार, खासदारांच्या घरातील ‘जेन झी’ने तोंडावर पाडले आहे. त्यात ज्या राज्यातून धर्मेंद्र प्रधान येतात त्या ओडिशातील भाजपच्या खासदार अपराजिता सारंगी यांच्या कन्येने हा जेन झीचा बिगूल फुंकून भाजपाई नेत्यांच्या नाकातोंडात या उद्रेकाचा धूर जाईल, अशी व्यवस्था केली. अपराजिता या माजी प्रशासकीय अधिकारी आहेत. त्यांच्या कन्या अर्चिता यांनी जंतर मंतरच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देणारी पोस्ट केल्यानंतर ही पोस्ट मागे घेण्यासाठी धर्मेंद्र प्रधान यांच्या पीएचा फोन आला तरीही अर्चिता यांनी पोस्ट मागे घेतली नाही. आसाममधील मंत्री केशव महंत यांच्या मुलीनेही उघडपणे या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. वडील मंत्री असले तरी मुलीची विचारधारा वेगळी असू शकते, असे म्हणत आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आपली अब्रू झाकण्याचा प्रयत्न केला. उत्तर प्रदेशमधील भाजपचे माजी आमदार विक्रमसिंग यांची मुलगी यशस्विनी हिने तर सरकारच्या धोरणांची टर उडवत देशाचे नवे शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी म्हणजे एक वाईट विनोद अशी जळजळीत टीका केली. एकूणात ‘जेन झी’ला दूषणे देण्याच्या नादात भाजप नेत्यांच्या घरातील जनरेशन नेक्स्ट अर्थात जेन झीने आपल्या मातापित्यांसह पक्षाच्या नेतृत्वाला आरसा दाखविण्याचे काम केले आहे.
सयोनींची रील
माणसे सरड्यासारखी रंग बदलतात. त्यात राजकारणासारख्या कोणत्याही संवेदना नसलेल्या क्षेत्रातील रंगबदलाबद्दल न बोललेले बरे. अवघ्या चारेक महिन्यांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारवर रणरागिणीसारख्या तुटून पडणाऱ्या तृणमुलच्या खासदार सयोनी घोष सध्या भाजपच्या स्तुतिसुमनांची माळ ओढताना दिसत आहेत. सयोनी घोष सध्या त्यांच्या संसदेतील एका रीलमुळे चर्चेत आहेत. मुळात रीलसारखी थेरं करायला संसद भवन हे काही पर्यटनस्थळ नाही. मात्र, सयोनी भाजपच्या कळपात सामील झाल्यामुळे बहुधा त्यांना मुभा देण्यात आली असावी. दिल्लीत संसद अधिवेशनादरम्यान जोरदार पाऊस झाला. या पावसांत संसद भवनातच अडकून पडलेल्या सयोनी यांच्यातील कलाकार जागा झाला. ‘इस तरह बरसात का मौसम कभी आया न था’, अशी कॅप्शन देत सयोनी यांनी रील शेअर केली. त्यानंतर त्यांच्यावर टीकेचा भडिमार होत आहे. पूर्वाश्रमीच्या बंगाली अभिनेत्री असलेल्या सयोनी यांचा आजवरचा राजकीय प्रवास विस्मयकारक आहे. स्टारडम असलेल्या सयोनी यांना खरे तर ममता बॅनर्जी यांनी पुढे आणले. संधी दिली. मात्र सयोनी कृतघ्न निघाल्या. ज्या मोदी व शहा यांच्यावर त्या संसदेत तुटून पडायच्या, त्यांचेच गुणगान गाण्यात सध्या त्या व्यस्त आहे.




























































