
‘हिंदुस्थानातील तरुणांना अमली पदार्थांच्या जाळय़ात ओढण्यासाठी शत्रू देश हरतऱ्हेचे प्रयत्न करत आहेत. अमली पदार्थांचा पुरवठा करून कमाई करतानाच हिंदुस्थानला उद्ध्वस्त करणे हा दहशतवादी कटाचाच एक भाग आहे,’ असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केला. नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नशामुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियानाची सुरुवात केली. त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी अभियानाचा 100 दिवसांचा रोडमॅपही सांगितला. ‘पुढचे 100 रविवार हे नशामुक्त हिंदुस्थानच्या दिशेने उचललेली 100 मजबूत पावले असतील. हिंदुस्थानातील युवक सजग, जबाबदार आणि आपल्या कर्तव्याप्रति जागरूक असून त्यांनी या अभियानाचे नेतृत्व करावे, असे आवाहन मोदींनी केले.
एखादा तरुण नशेच्या आहारी गेल्यास ते फक्त त्याचे नुकसान नसते. कुटुंब, समाज आणि देशाचेही नुकसान असते. आपले युवक नशेच्या विळख्यात अडकावेत यासाठी देशाचे शत्रू टपूनच बसलेले आहेत. हा दहशतवादाचाच भाग आहे.
कसे असेल अभियान?
पुढचे 100 आठवडे दर रविवारी कला, संस्कृती, खेळ आणि इतर उपक्रम राबवले जातील.
या उपक्रमांमध्ये जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावे यासाठी प्रयत्न केला जाईल.
या उपक्रमांद्वारे नशामुक्तीचा संदेश देशभरात पोहोचवला जाईल.


























































