
पुण्याच्या बावधन-भुगाव-भुकूम टेकडय़ांच्या परिसरात अत्यंत लाजाळू आणि दुर्मीळ मानल्या जाणाऱ्या ‘चौशिंगा’ हरणाचे दर्शन झाले आहे. वन्यजीव अभ्यासक अर्णव गंधे आणि छायाचित्रकार रोहित खरे यांनी या हरणाचे पह्टो काढले. बावधन-भुगाव-भुकूम या परिसरात वन्यजीव फिरत असतात. त्यांचे अधूनमधून दर्शन होत असते. मात्र वाढते शहरीकरण आणि टेकडय़ांवर होणारी अनधिकृत बांधकामे या प्राण्यांच्या अधिवासावर थेट आक्रमण करत आहेत. परदेशी वृक्षांच्या लागवडीमुळे स्थानिक गवताळ प्रदेश नष्ट होत असून त्याचा फटका चौशिंगासारख्या कुरंग कुळातील प्राण्यांना बसत असल्याची खंत ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक डॉ. संजीव नलावडे यांनी अधोरेखित केली.


























































