
‘काही बोलताच येत नाही. व्यक्त होता येत नाही अशी खाती सरकारमध्ये मला मिळाली आहेत,’ असे वक्तव्य राज्याच्या पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पंकजा मुंडे बोलत होत्या. माजी मंत्री धनंजय मुंडे हेदेखील व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी बोलताना पंकजा यांनी आपल्या खात्याबद्दल नाराजी व्यक्त केली. ‘धनंजय मुंडे यांना समाजकल्याण खातं मिळालं होतं. मला तर पशुसंवर्धन आणि पर्यावरण खातं मिळालंय. पण या खात्यांमध्ये व्यक्तच होता येत नाही. पर्यावरण मंत्रालय काय आहे हे लोकांना समजवता समजवता नाकी नऊ येतात,’ असे पंकजा म्हणाल्या. मात्र ‘गोपीनाथ मुंडे यांनी आम्हाला एक शिकवण दिली आहे. जे पद मिळेल ते आपल्या नावाने ओळखले जाईल, असे काम करा. या संस्कारात आम्ही वाढलेलो आहोत,’ असेही त्या म्हणाल्या.
राजकारणातून रिटायर्ड व्हावंसं वाटतंय!
बीड जिह्यातीलच आणखी एका कार्यक्रमात लोकांना संबोधित करताना पंकजा मुंडे यांनी रिटायर्ड होण्याची इच्छा बोलून दाखवली. हे सांगताना रस्त्यांवरील खोदकामावर नाराजी व्यक्त केली. ‘आधी दोन पदरी रस्ता होता, आता चार पदरी, सहा पदरी सुरू आहे. त्यासाठी एवढं खोदून ठेवलंय की रस्त्यावरून खडकत-खडकत इथपर्यंत आले. गेल्या 24 वर्षांपासून याच रस्त्याने, हीच माणसं आणि तेच सगळं, हे कसं बदलायचं? कंटाळा आलाय, आता रिटायर्ड व्हावं वाटतं. पण लोकांचा उत्साह पाहून नव्याने उभारी मिळते,’ असे त्या म्हणाल्या

























































