
इंडोनेशियाच्या मदुरा बेटाजवळ रविवारी एका प्रवासी बोटीला भीषण आग लागली. या प्रवासी बोटीत क्रू मेंबर्ससह 271 जण प्रवास करत होते. आगीत पाच जणांचा मृत्यू झाला असून 225 जणांना सुरक्षित वाचवण्यात आले आहे. अद्याप 41 जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.
ही बोट पूर्व जावा प्रांतातील सुराबायाहून दक्षिण सुलावेसीमधील मकासारकडे जात होती. यावेळी जावाच्या ईशान्य किनाऱ्याजवळील मदुरा बेटाजवळ बोटीला आग लागली. त्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले. रेस्क्यू ऑपरेशनसाठी परिसरात अनेक जहाजे तैनात केली आहेत. बेपत्ता प्रवाशांचा शोध घेत आहेत. बोटीला आग कशामुळे लागली याचे कारण स्पष्ट झालेले नाही.
याआधीही जुलै 2025 मध्ये इंडोनेशियाच्या उत्तर सुलावेसी प्रांतातील एका प्रवासी जहाजाला आग लागल्याने 3 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेवेळी 150 जणांना सुखरूप वाचवले होते. या घटनेव्यतिरिक्त इंडोनेशियात अनेक फेरींना आग लागण्याच्या आणि सागरी अपघातांच्या घटना घडल्या आहेत.




























































