विज्ञान रंजन – सागरातील उष्ण प्रवाह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

<< विनायक

आपल्या प्राचीन कथानकातून सागराने 14 रत्न दिल्याचं वर्णन येतं. ‘लक्ष्मी, सुरा, पारिजातक…’ इ. परंतु आधुनिक काळात सागरी संशोधनातही प्रवाळ मोती अशा ‘जैविक’ रत्नांपलीकडे आणखी कितीतरी अजब गोष्टी सापडल्या आहेत. म्हणजे त्या पूर्वापार तिथेच होत्या. माणसाला उशिरा समजल्या. निसर्गातील मुळातल्या किंवा आधीच अस्तित्वात असलेल्या गोष्टींची जाणीव म्हणजे ‘डिस्कव्हरी’ आणि नैसर्गिक तत्त्वांचा वापर करूनच माणसाने स्वतंत्रपणे काही अस्तित्वात आणणं हे ‘इन्व्हेन्शन’ असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ दगडी कोळसा नैसर्गिकच होता. पाण्याची वाफही निसर्गनियमानेच होत होती. परंतु एखाद्या यंत्रात त्याचा ‘इंधन’ म्हणून वापर करत ते चालवणं हे इन्व्हेन्शन. रेल्वेच्या पहिल्या वाफेच्या इंजिनाचं झालं तसंच.

माणसाने निसर्गाशी मैत्री करून संशोधित केलेल्या अशा अनेक गोष्टी आहेत. त्यात विजेचा बल्बसुद्धा आहे. बरीच नैसर्गिक तत्त्वे माणसाला समजत आहेत. तरीही काही मूळ नैसर्गिक प्रक्रियांमधलं कुतूहल तसंच राहतं. जगात सर्वत्र पाऊस पडतो तो समुद्राच्या पाण्याच्या वाफेमुळेच हे सर्वांना ठाऊक असतं. परंतु कधी एल निनो, तर कधी ला निना अशा नैसर्गिक ‘पॅटर्न’मुळे पावसाळ्यावर कसा परिणाम होणार हे जाणून घेणं केवळ कुतूहलापुरतं नव्हे, तर मानवी जीवनासाठीही आवश्यक ठरतं. त्याचा ऊहापोह आपण गेल्या काही दिवसांत खूप केलाय. जगभर त्याची चर्चा सुरूच आहे.

विशाल सागराच्या उदरात दडलंय काय (काय) याचा विचार करताना दक्षिण अमेरिका खंडामध्ये पूर्वेकडच्या बाजूला असलेल्या अ‍ॅटलँटिक महासागरातील ‘गल्फ स्ट्रीम’ या उष्ण सागरी जलौघाची आठवण आली. भरसमुद्रात मेक्सिकोपासून थेट उत्तर अ‍ॅटलँटिक सागरापर्यंत वाहणारा ‘गल्फ स्ट्रीम’ म्हणजे काय? त्याची व्याप्ती किती? त्याचे परिणाम कोणते? असे अनेक प्रश्न मनात आले.

या ‘गल्फ स्ट्रीम’ला अ‍ॅटलँटिक सागरातला सहजतेने वाहणारा उष्ण झरा (करंट) म्हटलं जातं. मेक्सिकोच्या गल्फ किंवा आखातात या उष्ण सागरी प्रवाहाचा उगम होतो. आखात म्हणजे समुद्राचा अनेक बाजूंनी जमीन असलेला भाग. पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातील 25 अक्षांशावर या ‘गल्फ करंट’चा आरंभ होतो आणि तो उत्तर अ‍ॅटलँटिक प्रवाहात 55 अक्षांशावर मिसळून जातो. अमेरिकेच्या (यू.एस.) पूर्व किनाऱयाकडून हा प्रवाह उत्तरेकडे वाहतो. तो फ्लोरिडाच्या सामुद्रधुनीतून वर जात जात नॉर्थ कॅरोलिना राज्याच्या पूर्वेला सुमारे 36 अक्षांशावर वळून नॉर्थवेस्ट किंवा वायव्य युरोपच्या दिशेने वाहू लागतो. तेथे त्याला नॉर्थ अ‍ॅटलँटिक करंट म्हणतात. अमेरिकेच्या पूर्वेला 40 अक्षांशावर त्याचे दोन भाग होतात. एक उत्तर युरोपकडे, तर एक भाग कॅनेरी करंट म्हणून द आफ्रिकेला वळसा घालतो.

‘गल्फ स्ट्रीम’चा परिणाम अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील राज्यांमधल्या आणि उत्तर पश्चिम किंवा वायव्येकडच्या युरोपीय देशांवर होतो. त्यामुळे या ‘करंट’ जवळच्या भूप्रदेशातलं हवामान उबदार राहतं. विशेषतः उत्तर युरोपात प्रचंड थंडी आणि बर्फाळ हिवाळ्यात या उबदार प्रवाहाचा फायदाच होतो. परंतु इतरत्र असलेले थंड हवामान आणि ‘गल्फ-स्ट्रीम’ परिसरातलं उष्ण हवामान यांच्यातील तफावतीने विविध ठिकाणी वादळंही निर्माण होतात.

इसवी सन 1512 मध्ये जुआन लिऑन या स्पॅनिश दर्यावर्दीला या ‘करंट’ची जाणीव झाली. 1768 मध्ये वैज्ञानिक बेंजामिन फ्रॅन्कलिन यांना या ‘करंट’विषयी माहिती मिळाली ती एका तक्रारीतून. अमेरिकन टपाल आणि माल इंग्लंडला येतो त्याच्या प्रवासाच्या वेळेपेक्षा ब्रिटिश टपाल व माल अमेरिकेत पोहोचायला. अधिक वेळ का लागतो. फ्रॅन्कलिन यांनी त्यांच्या टिमोधी या कॅप्टन चुलतभावाला त्याविषयी विचारलं. तेव्हा त्याने वाटेत येणारा उबदार सागरी प्रवाह, त्यातील व्हेल माशांचं तांडव, समुद्राचा बदलता रंग अशा अनेक अडथळ्यांची जंत्री वाचली. मग फ्रॅन्कलिन यांनी या ‘उष्ण प्रवाहा’चा नकाशा तयार केला.

आता समुद्रातीलच एक ‘प्रवाहा’चे पाणी उष्ण कसे होते? सोप्या शब्दात सांगायचं तर पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा (पश्चिम ते पूर्व) असा परिवलनाचा वेग, वेगवान वाऱ्यांमुळे सागरपृष्ठावरच्या पाण्याला मिळणारी जलदगती आणि ज्या भागात हा प्रवाह ‘कोंडला’ जातो त्याच्या भोवतीच्या खंडांची भूमी या सगळ्याचा एकत्रित परिणाम होऊन मेक्सिको ते उत्तर अ‍ॅटलँटिकपर्यंतचे पाणी गरम प्रवाह निर्माण करते.

ही उष्णता वाऱ्यांच्या वेगाने पाण्याच्या थरांमधील तापमानात बदल घडवते (थर्मो) आणि सागरी मिठाची घनता (हॅलाइन) यातून ‘थर्मोहॅलाइन इफेक्ट’ तयार होतो. या सर्व कारणांमुळे ‘गल्फ स्ट्रीम’ तयार होतो हे लक्षात आल्यावर बोटी शक्यतो वायव्येकडच्या वाऱ्यांना टाळून प्रवास करतात. वाऱ्यांचा वेग 15 नॉटिकल किंवा ताशी 27.78 कि.मी. वेग असेल तर काळजी घ्यावी लागते. या ‘करंट’चा एक परिणाम म्हणजे सागरी पाण्याची पातळी वाढते आणि हवामान विषम होते.