
‘नीट’ पेपरफुटीच्या विरोधात देशव्यापी आंदोलन करून सरकारला हादरा देणाऱ्या कॉक्रोच पार्टीने आता शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी) पेपर घोटाळ्याकडे मोर्चा वळवला आहे. टीईटी पेपर घोटाळ्याच्या मुद्दय़ावर मोठे आंदोलन उभारण्याची तयारी ‘सीजेपी’ने सुरू केल्याचे सूत्रांकडून समजते.
‘सीजेपी’च्या प्रमुख सदस्यांची महत्त्वपूर्ण बैठक 5 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. ‘सीजेपी’चे संस्थापक अभिजित दीपके यांच्या घरी ही बैठक होणार असून त्यात पुढील वाटचालीची दिशा ठरवली जाणार आहे.
सूचना, कल्पना घेऊन या!
सीजेपीच्या सर्व सदस्यांना बैठकीची पूर्वतयारी करण्यास सांगण्यात आले आहे. आपापल्या राज्यातील स्वयंसेवक व विद्यार्थ्यांशी संवाद साधून नवीन कल्पना आणि सूचनांसह बैठकीला या, असा संदेश देण्यात आला आहे.
फास्ट ट्रक कोर्टाच्या न्यायमूर्ती बलीगा यांची बदली
आज नीट पेपरफुटीची सुनावणी
‘नीट’ पेपरफुटीवरून देशभरात प्रचंड वादळ उठल्यानंतर या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रक कोर्टात करण्यात येईल, असे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले होते. मात्र, सीबीआयचे वकील गैरहजर राहिल्याने फास्ट ट्रक कोर्टाची सुनावणी पहिल्याच दिवशी टळली होती. त्यानंतर आता या न्यायालयाचे विशेष न्यायमूर्ती अनु ग्रोव्हर बलीगा यांचीच तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी विशेष न्यायमूर्ती अजय गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नीट पेपरफुटीची उद्या सोमवारी सुनावणी होणार आहे.


























































