
यवतमाळ जिल्ह्यातील वणी ते मुकुटबन या मार्गावरील निर्गुडा नदीवरील पुलाची दुरावस्था झाली आहे. पुलावरील एका बाजूचा संपूर्ण सुरक्षा कठडा तुटून नदीत कोसळला आहे. धोकादायक परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी तुटलेल्या कठड्याच्या ठिकाणी चक्क बांबू बांधून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे हा पूल प्रवाशांसाठी ‘मृत्यूचा सापळा’ ठरत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.
निर्गुडा नदी सध्या दुथडी भरून वाहत असून पुलावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यातच एका बाजूचा सुरक्षा कठडा पूर्णपणे तुटल्याने वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज न आल्यास किंवा क्षणभर नजरचूक झाल्यास वाहन थेट नदीपात्रात कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. या धोकादायक पुलावरून दिवस-रात्र अवजड वाहनांची वाहतूक सुरूच आहे. त्यामुळे पुलाची सुरक्षितता आणि प्रवाशांच्या जीविताचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), एमएसआयडीसी या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. तुटलेला सुरक्षा कठडा, खड्डेमय पूल आणि त्यावरून सुरू असलेली अवजड वाहतूक यामुळे कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. मात्र, प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी केवळ तात्पुरती डागडुजी केली जात असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.
निर्गुडा पुलाची तातडीने पाहणी करून मजबूत सुरक्षा कठडा उभारावा, पुलावरील खड्डे बुजवावेत आणि मार्गाची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.























































