Nanded News – 311 वर्षांची अखंड परंपरा! श्रीवारी लाडू प्रसादाला 311 वर्षे पूर्ण; श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचे गोड प्रतीक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>दिपक बाऱ्हाळीकर<<

जगभरातील कोट्यवधी श्री व्यंकटेश्वर स्वामी भक्तांसाठी आजचा दिवस अत्यंत खास आहे. तिरुमलातील सुप्रसिद्ध श्रीवारी लाडू प्रसादाने 311 वर्षांची ऐतिहासिक परंपरा पूर्ण केली आहे. दि. 2 ऑगस्ट 1715 रोजी सुरू झालेली ही प्रसादाची परंपरा आजही तेवढ्याच श्रद्धेने आणि भक्तिभावाने सुरू असून, जगातील सर्वात प्रसिद्ध मंदिर प्रसाद म्हणून श्रीवारी लाडूची ओळख निर्माण झाली आहे.

इतिहासानुसार दि. 2 ऑगस्ट 1715 रोजी तिरुमला तिरुपती देवस्थानम् (TTD) मध्ये श्री व्यंकटेश्वर स्वामींच्या प्रसादासाठी प्रथमच लाडू तयार करण्यात आला. दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला स्वामींचा आशीर्वाद म्हणून गोड प्रसाद मिळावा, या उद्देशाने ही परंपरा सुरू करण्यात आली. त्यानंतर तब्बल 311 वर्षांपासून एकही दिवस खंड न पडता ही परंपरा अखंड सुरू आहे.

श्रीवारींच्या दर्शनानंतर भक्तांनी स्वामींचा प्रसाद घरी नेऊन कुटुंबीयांसोबत वाटून खावा आणि देवाचा आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचावा, या भावनेतून लाडू प्रसादाची सुरुवात झाली. हा लाडू केवळ गोड पदार्थ नसून, तो श्री व्यंकटेश्वर स्वामींच्या कृपेचे आणि भक्तीचे प्रतीक मानला जातो.

शुद्ध बेसन, तूप, साखर, काजू, बदाम, मनुका, वेलची आणि इतर निवडक घटकांपासून अत्यंत स्वच्छ व पारंपरिक पद्धतीने हा लाडू तयार केला जातो. प्रत्येक लाडूची गुणवत्ता कायम राखण्यासाठी तिरूमला तिरुपती देवस्थानचे प्रशिक्षित कर्मचारी विशेष काळजी घेतात. श्रीवारी लाडूला भौगोलिक मानांकन (GI Tag) देखील प्राप्त झाले आहे. त्यामुळे या लाडूची अस्सल ओळख आणि गुणवत्ता अधिकृतपणे संरक्षित झाली आहे.

दररोज तिरुमलात येणाऱ्या हजारो ते लाखो भाविकांमुळे श्रीवारी लाडूची मागणी प्रचंड असते. सामान्य दिवसांत लाखो लाडू तयार केले जातात, तर ब्रह्मोत्सव, वैकुंठ एकादशी, नववर्ष आणि सुट्ट्यांच्या काळात ही संख्या आणखी वाढते. तिरूमला तिरुपती देवस्थानच्या अत्याधुनिक ‘पोटू’ (स्वयंपाकगृह) मध्ये मोठ्या प्रमाणावर लाडू तयार करून भाविकांना वितरित केले जातात. यात छोटा लाडू 50 रुपये तर मोठा लाडू 200 रुपयाला मिळतो.

अनेक भाविकांसाठी श्रीवारींच्या दर्शनाइतकाच आनंद लाडू प्रसाद मिळण्यात असतो. दर्शनानंतर हातात लाडू आल्यावर भक्तांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद झळकतो. अनेकजण हा प्रसाद घरी नेऊन कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रांमध्ये वाटतात. अनेकांच्या मते, “तिरुमलाचे दर्शन लाडूशिवाय अपूर्ण आहे.”

गेल्या तीन शतकांहून अधिक काळात अनेक राजवटी बदलल्या, काळ बदलला, तंत्रज्ञान बदलले; मात्र श्रीवारी लाडूची परंपरा आणि त्यामागील श्रद्धा आजही तितकीच अढळ आहे. भारतासह जगभरातील कोट्यवधी भक्तांसाठी हा लाडू म्हणजे श्री व्यंकटेश्वर स्वामींच्या कृपेची गोड आठवण आणि भक्तीचे अमूल्य प्रतीक आहे. 311 वर्षांची ही अखंड परंपरा आजही लाखो भक्तांच्या श्रद्धेला, भक्तीला आणि विश्वासाला गोडवा देत आहे.