पावसाचा जोर… तलाव 90 टक्के भरले; मुंबईतील पाणीकपात मागे घेणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात दमदार पाऊस पडत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांचा पाणीसाठा 90 टक्क्यांवर पोचला आहे. त्यामुळे मुंबईकरांचे पाण्याचे टेन्शन दूर झाले आहे. मुंबईवरील 10 टक्के पाणीकपात पूर्णपणे उठली नसली तरी आता मुंबईकरांचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्याच्या दिशेने महापालिकेने पाऊल टाकले आहे. महापालिकेने गेल्या तीन-चार दिवसांपासून मुंबईला दररोज 4050 दशलक्ष लिटरपेक्षा अधिक पाणी पुरवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

जलअभियंता विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 6 वाजेपयर्यंत मुंबईला पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या सातही तलावांमधील एकूण पाणीसाठा आवश्यक क्षमतेच्या 89.08 टक्क्यांवर पोहोचला आहे. कालपासून  धरणात 0.67 टक्के वाढ झाली असून पाणीसाठा जवळपास 90 टक्क्यांच्या उंबरठय़ावर पोहोचला आहे.

सध्याची आकडेवारी

शहराच्या जलाशयांची एकूण साठवण क्षमता 14,47,363 दशलक्ष लिटर (एमएलडी) इतकी आहे. त्यापैकी सध्या 12,89,289 दशलक्ष लिटर (एमएलडी) इतका वापरण्यायोग्य पाणीसाठा आहे.

पावसामुळे पाणीसाठय़ात वाढ

सात तलावांपैकी मोडक सागर आणि विहार तलाव 100 टक्के भरले आहेत, तर तानसा 99.58 टक्के आणि तुळशी 99.46 तर मध्य वैतरणा 91.65 टक्के भरले आहे. मुंबईचा पिण्याच्या पाण्याचा सर्वात मोठा स्रोत असलेल्या भातसा धरणात 87.14 टक्के, तर अप्पर वैतरणा धरणात 78.39 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

सात प्रमुख तलावांमधून मुंबईला दररोज सुमारे 4100 दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणीपुरवठा केला जातो. महापालिकेने 15 मेपासून 10 टक्के पाणीकपात लागू केली. मात्र आता चांगला पाऊस झाल्याने मागील तीन-चार दिवसांपासून महापालिका दररोज 4050 दशलक्ष लिटरहून अधिक पाणी पुरवत आहे.

मुंबईत सध्या 10 टक्के पाणीकपात आहे. आता पाणलोट क्षेत्रातील दमदार पावसामुळे महापालिकेने पाणीपुरवठा वाढवला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास येत्या काही दिवसांत मुंबईतील पाणीकपात मागे घेण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.