
धर्माबाद तालुक्यातील जारीकोट व परिसरातील अनेक तरुणांनी स्पर्धा परीक्षांच्या जोरावर राज्य सेवेत मोठी मजल मारली. त्यांच्या यशामुळे या भागाचे नाव राज्यभर पोहोचले. मात्र, याच परिसरातील दोन वरिष्ठ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत अडकल्याने संपूर्ण तालुक्याची प्रतिमा डागाळली असून समाजातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
तीन वर्षांपूर्वी 9 जून 2023 रोजी अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे व जारीकोट येथील रहिवाशी अनिल रामोड यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या भूसंपादनात शेतकर्यांना वाढीव मोबदला मंजूर करण्यासाठी आठ लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यावेळी त्यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली होती. त्यांच्या बानेर येथील निवासस्थानातून सहा कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली होती. त्यानंतर ते काही काळ जेलमध्ये होते.
आता त्याच धर्माबाद तालुक्यातील रत्नाळी गावचे मूळ रहिवासी आणि बीड येथे विभागीय वनाधिकारी म्हणून कार्यरत असलेले श्रीनिवास लखमावाड यांच्यावर कारवाई केली आहे. तब्बल 45 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याच्या आरोपावरून लखमावाड छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बीड येथे सापळा रचून रंगेहाथ अटक केली. सध्या ते पोलीस कोठडीत आहेत. या कारवाईने प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. 2016 च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वनसेवा परिक्षेत ते अनुसूचित जमाती प्रवर्गातून राज्यात प्रथम आले होते. त्यांना वृक्ष लागवडीचा निधी आणि बिले मंजूर करणे एका वनपरिक्षेत्र अधिकार्याच्या निलंबनाचा प्रस्ताव रोखणे आदी प्रकरणात अटक झाली होती.
दरम्यान, स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या तरुणांसमोर अशा घटनांमुळे चुकीचा संदेश जात असून, सरकारी सेवेत प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता जपणे हीच खरी समाजसेवा असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. भ्रष्टाचार करणार्यांवर कठोर कारवाई होत असल्याने इतर अधिकार्यांनीही यातून धडा घ्यावा, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.


























































