
महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेचा आत्मा असलेल्या पंढरपूरच्या वारीदरम्यान यंदा ‘लालपरी’ने प्रवासी सेवेत चांगली कामगिरी केली. आषाढी यात्रेतील भाविकांच्या सेवेसाठी एसटी महामंडळाने तब्बल 5,500 बसेसच्या माध्यमातून 21 हजार 527 फेऱ्या चालवल्या. या बसफेऱ्यांमधून 9 लाख 24 हजार 738 भाविकांनी प्रवास केला. महामंडळाने भाविकांना सुरक्षित प्रवास घडवून देतानाच 41 कोटी 18 लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न प्राप्त केले. गतवर्षीपेक्षा या वर्षी उत्पन्नात 5 कोटी 30 लाख रुपयांची वाढ झाली.
विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक आषाढी यात्रेसाठी पंढरपूरला जातात. त्यांच्या प्रवासात यंदाही महाराष्ट्राची ‘लालपरी’ विश्वासाची सोबती ठरली. आषाढी यात्रेसाठी एसटी महामंडळाने राज्याच्या विविध भागांतून पंढरपूरसाठी विशेष वाहतुकीचे नियोजन केले होते.
प्रवासी देवो भव…
एसटी महामंडळाने भाविक प्रवाशांना विविध सवलतींचा लाभ देतानाच प्रचंड गर्दी, वाहतुकीचा ताण यांसारख्या आव्हानात्मक परिस्थितीत हजारो फेऱ्यांचे नियोजन केले. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या बसेस, चालक-वाहक, यांत्रिक, सुरक्षा आणि प्रशासकीय विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आषाढी यात्रेसाठी दिवस-रात्र मेहनत घेतली. प्रवासी देवो भव… या भावनेतून एसटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावल्याने वारी आणि लालपरीचे नाते आणखी घट्ट झाले.


























































