मुसळधार पावसानंतर अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू, 3886 यात्रेकरूंची तुकडी दर्शनासाठी रवाना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुसळधार पावसामुळे दोन दिवस बंद असलेला जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग अंशतः पुन्हा सुरू करण्यात आला आहे. त्यानंतर रविवारी सकाळी भगवती नगर बेस कॅम्पवरून 3 हजार 886 यात्रेकरूंची नवीन तुकडी अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाली.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका दिवसाच्या विश्रांतीनंतर 25 वी तुकडी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत 177 वाहनांच्या ताफ्यासह पहाटे 2ः52 वाजता जम्मू बेस कॅम्पवरून मध्य कश्मीरमधील गांदरबल येथील बाल्टालसाठी रवाना झाली. अमरनाथ यात्रा 3 जुलैपासून सुरू झाली. आतापर्यंत साडेचार लाखांहून अधिक यात्रेकरूंनी अमरनाथ गुहेला भेट दिली आहे.

3 जुलै रोजी यात्रा सुरू झाल्यापासून कश्मीर हिमालयातील 3,880 मीटर उंचीवर असलेल्या अमरनाथच्या पवित्र गुहेचे 4.50 लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले आहे. 57 दिवसांची ही यात्रा 28 ऑगस्ट रोजी संपन्न होणार आहे.

हलक्या वाहनांना परवानगी

उधमपूरमधील झाकानी आणि रामबनमधील बनिहालदरम्यानच्या अनेक ठिकाणी सततच्या पावसामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गाचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले होते व दुरुस्तीचे मोठे काम करणे आवश्यक होते. हा 250 किमी लांबीचा महामार्ग आता  देवाल पुलाजवळ एकेरी वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात आला आहे, ज्यामुळे यात्रेचा ताफा पुन्हा मार्गस्थ होऊ शकला.