अभिषेकच्या २३३ धावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग अपयशामुळे टीकेचा धनी ठरलेल्या अभिषेक शर्माने देशांतर्गत क्रिकेटमध्ये बॅटमधून अक्षरशः वादळ निर्माण केले. पंजाब आंतरजिल्हा वरिष्ठ स्पर्धेत अमृतसरकडून खेळताना त्याने तरणतारणच्या गोलंदाजांचा चक्काचूर करत अवघ्या ९१ चेंडूंमध्ये २३३ धावांची तुफानी खेळी साकारली. त्याच्या डावात १५ चौकार आणि तब्बल २५ षटकारांचा समावेश होता. तब्बल २५६.०४ च्या स्ट्राइक रेटने खेळत त्याने गोलंदाजांच्या चेंडूंना मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात
धाडले.

ही खेळी अशा वेळी आली आहे, जेव्हा अभिषेकचा आंतरराष्ट्रीय फॉर्म चिंतेचा विषय ठरला आहे. झिम्बाब्वे दौऱ्यात तीन डावांत त्याला केवळ ११ धावा करता आल्या. त्याआधी इंग्लंडविरुद्ध पाच टी-२० सामन्यांत १३१, तर आयर्लंडविरुद्ध दोन सामन्यांत केवळ ४९ धावांचीच भर पडली. गेल्या दहा टी-२० आंतरराष्ट्रीय डावांत त्याला फक्त एकदाच अर्धशतक गाठता आले. धावांपेक्षा त्याच्या बाद होण्याच्या पद्धतीने अधिक चिंता वाढवली. झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुजराबानीने

तिन्ही सामन्यांत ऑफस्टंपबाहेरील चेंडूंवर त्याची कमकुवत बाजू उघडी पाडली.
मात्र देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळलेल्या या तुफानी खेळीने अभिषेकने एक स्पष्ट संदेश दिला आहे, फॉर्म तात्पुरता असतो, पण फटकेबाजी कायम असते. आता हीच लय तो पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कायम ठेवतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.