
कोरोना महामारीच्या संकटानंतर वर्क फ्रॉम होम ही कार्यपद्धती जगभरात मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आली. अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्याचे स्वातंत्र्य दिले, ज्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांचा प्रवासाचा वेळ आणि ताण वाचला. परंतु, आता परिस्थिती बदलत असून अनेक कंपन्या पुन्हा आपल्या जुन्या कार्यपद्धतीकडे म्हणजेच हायब्रिड मॉडेलकडे वळत आहेत. कंपन्यांच्या या अचानक बदललेल्या धोरणांमुळे कर्मचाऱ्यांसमोर नवीन अडचणी आणि प्रश्न निर्माण होऊ लागल्या आहेत. एका कर्मचाऱ्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कर्मचाऱ्याला आता आठवड्यातून दोन दिवस ऑफिसमध्ये जाण्यासाठी दररोज तब्बल 115 किलोमीटरचा प्रवास करावा लागत असल्याचे त्याने म्हटले आहे.
Reddit या सोशल मीडियावर एक पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये कर्मचाऱ्याने आपली आपबिती सांगितली आहे. त्याला पाच वर्षांचा अनुभव असून गेल्या वर्षभरापासून एका मार्केटिंग कंपनीत काम करत आहे. कंपनीने आधी वर्क फ्रॉम होमची अट ठेवूनच नोकरी दिली होती. परंतु आता अचानक ऑफिसमध्ये बोलावल्यामुळे कर्मचाऱ्याला रोजच लांबचा प्रवास करावा लागत असल्याचे त्याने म्हटले आहे. त्यातच कंपनीत पगारवाढ आणि करिअरच्या वाढीबाबत (अप्रायझल) कोणतीही स्पष्टता नसल्यामुळे या कर्मचाऱ्याने आता नवीन नोकरी शोधण्यास सुरुवात केल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे.
2 days of commuting, 115 km/day. Is this a valid reason for job change?
byu/whoisthisonred inIndianWorkplace
नवीन मुलाखतीदरम्यान जुनी नोकरी सोडण्याचे कारण काय? असा प्रश्न विचारल्यावर या कर्मचाऱ्याने अत्यंत हुशारीने उत्तरे दिली. कंपनीतील नोकरी कपात (लेऑफ) आणि घरापासून ऑफिसचे अंतर जास्त असणे हे कारण त्याने मुलाखतीत सांगितले. तसेच, आपल्याला फक्त घरून काम करायचे नाही तर, दररोजचा प्रवास कमी आणि सोयीचा असावा, असेही त्याने मुलाखतकाराला स्पष्टपणे सांगितले.
या संपूर्ण प्रकरणावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. काही युजर्सच्या मते, आजकाल लांबचा प्रवास करणे ही एक सामान्य बाब झाली आहे. तर काहींनी नवीन कंपनीत सुद्धा भविष्यात अशीच हायब्रिड पद्धत लागू केली जाऊ शकते. त्यामुळे सावध राहणे गरजेचे आहे, असा सल्ला दिला. एका युजरने सांगितले की, पूर्णपणे वर्क फ्रॉम होम हवे असल्यास कंपनीच्या ऑफर लेटरमध्ये ही अट लिहून घेतली पाहिजे, असे सांगितले.



























































