
कॉकरोच जनता पार्टी (CJP)चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी अमेरिकेतील शिक्षणासाठीचा खर्च कसा उचलला, याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर स्पष्टीकरण दिले आहे. बोस्टन विद्यापीठाकडून मिळालेली शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्जाच्या मदतीने अमेरिकेतील शिक्षण पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पक्षाचा निधी क्राऊडफंडिंगच्या माध्यमातून उभारला जाईल आणि आर्थिक व्यवहारांमध्ये पूर्ण पारदर्शकता ठेवली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
बर्खा दत्त यांच्या MOJO या माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत दिपके यांनी सांगितले की, “बोस्टन विद्यापीठाकडून मला शिष्यवृत्ती मिळाली होती. उर्वरित खर्चासाठी मी शैक्षणिक कर्ज घेतले असून ते मला फेडायचे आहे.”
अभिजीत दिपके यांनी अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स राज्यातील बोस्टन विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ कम्युनिकेशनमधून Public Relations विषयात मास्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळवली आहे. जून महिन्यात भारतात परतल्यानंतर त्यांनी देशभर चर्चेत आलेल्या आंदोलनाचे नेतृत्व केले.
दिपके यांनी बर्खा दत्त यांना शिष्यवृत्तीचे कागदपत्रही दाखवले. त्यानुसार, बोस्टन विद्यापीठाने त्यांना प्रत्येक सत्रासाठी 12,500 डॉलर इतकी डीन्स स्कॉलरशिप दिली होती. तीन सत्रांसाठी मिळून ही रक्कम 37,500 डॉलर इतकी झाली.
त्यांच्या परदेशातील शिक्षणाचा खर्च कसा उचलला गेला, याबाबत गुजरातमधील एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने प्रश्न उपस्थित केल्यानंतर दिपके यांनी हे स्पष्टीकरण दिले.
CJPचा निधी क्राऊडफंडिंगमधून उभारणार
जंतरमंतर येथील आंदोलनादरम्यान CJPचा निधी कसा उभारला जात आहे आणि पुढील आर्थिक नियोजन काय असेल, याबाबतही दिपके यांनी भूमिका स्पष्ट केली. “आम्ही लोकांकडून निधी उभारणार आहोत. पक्षाच्या आर्थिक व्यवहारांमध्ये पूर्ण पारदर्शकता ठेवली जाईल,” असे त्यांनी सांगितले.
मुलाखतीत दिपके यांनी दिल्ली पोलिसांबाबतही दावा केला. “मी खोटं बोलणार नाही. चेहऱ्यावर मास्क घातलेले तीन जण आमच्याकडे आले आणि आंदोलनाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. दिल्ली पोलिसांतील कनिष्ठ अधिकारी आमच्याबद्दल सहानुभूती बाळगत होते. मात्र वरिष्ठ अधिकारी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार काम करत होते,” असे ते म्हणाले.




























































