शिर्डीत ‘व्हीव्हीआयपी’गिरीचा फज्जा; पोलिसांनी दाखवला दंडुका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shirdi-police-action-on-fake-vvip-vehicles-fancy-number-plate-state-emblem-removed

साईनगरी शिर्डीत नियमांना हरताळ फासून स्वतःला ‘व्हीव्हीआयपी’ असल्याचा आव आणणाऱयांचा अखेर फज्जा उडाला. नियमबाह्य राजमुद्रा आणि फॅन्सी नंबरप्लेट लावून मंदिर परिसरात रुबाब मिरवणाऱ्या दोन आलिशान वाहनांवर शिर्डी वाहतूक पोलिसांनी आज दंडात्मक कारवाईचा दंडुका उगारला. या प्रकारामुळे साईबाबा मंदिराच्या व्हीव्हीआयपी प्रवेशद्वार क्रमांक 2 समोरील मुख्य रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होऊन भाविकांची मोठी गैरसोय झाली.

संबंधित व्हीव्हीआयपी वाहनधारकांनी परिसरातील काही व्यावसायिकांशी दमदाटी केल्याचा आरोप व्यावसायिकांनी केला आहे. वाहतूक पोलिसांनी विचारणा केल्यानंतर ही वाहने एका आमदाराची असल्याचे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले.

घटनास्थळी वाहनांची तपासणी केली असता केंद्र सरकारने अनिवार्य केलेल्या हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले. एमएच-21 सीजी-7900 क्रमांकाच्या वाहनांवर अतिशय बारीक अक्षरांत नंबर लिहिण्यात आला होता. तसेच वाहनांवर ‘सत्यमेव जयते’ची राजमुद्रा लावून अधिकृत वाहन असल्याचा आभास निर्माण करण्यात आला होता.

घटनेची माहिती मिळताच शिर्डी वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोन्ही वाहनांवरील नियमबाह्य राजमुद्रा आणि फॅन्सी नंबरप्लेट हटवली. त्यानंतर मोटार वाहन कायद्यानुसार संबंधित वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. कारवाईनंतर परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यात आली.

साईनगरीत दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. अशा परिस्थितीत नियम धाब्यावर बसवून ‘व्हीव्हीआयपी’गिरीचा आव आणणाऱयांमुळे सामान्य भाविकांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे मंदिर परिसरात अशा प्रकारांवर सातत्याने कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि भाविकांकडून करण्यात येत आहे.

वाहतूक पोलिसांनी सांगितले की, वाहनांवर नियमबाह्य राजमुद्रा, फॅन्सी नंबरप्लेट किंवा शासकीय दर्जाचा आभास निर्माण करणारी कोणतीही चिन्हे लावणे कायद्याने मान्य नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱयांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार आहे.