ग्लासगोमधील रेस्टॉरंटने मागितली बाॅक्सर लव्हलिनाची माफी, हिंदुस्थानच्या नकाशातून वगळला होता काही भाग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ग्लासगोच्या लोकप्रिय रेस्टॉरंट, ‘मिस्टर…’ येथे एका सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 2026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 10 पदके जिंकून इतिहास रचणाऱ्या, हिंदुस्थानी बॉक्सिंग संघाचा सन्मान करण्यासाठी, ‘मिस्टर सिंग्स इंडिया’ या रेस्टॉरंटचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान, ऑलिम्पिक पदक विजेती बॉक्सर लव्हलिना बोरगोहेन हिने रेस्टॉरंटच्या आवारात लावलेल्या हिंदुस्थानच्या नकाशातील एका मोठ्या चुकीकडे लक्ष वेधले.

 

आज तक ने दिलेल्या वृत्तानुसार या नकाशात ईशान्य भारताचा काही भाग नव्हता तसेच कश्मीरचा काही भाग चुकीच्या पद्धतीने दर्शवला होता. लव्हलिनाच्या या आक्षेपानंतर, रेस्टॉरंट व्यवस्थापनाने आपली चूक मान्य केली. त्यांनी माफी मागितली त्याचबरोबर नकाशा बदलण्याचे आश्वासन दिले. मिस्टर सिंग्स इंडिया हे ग्लासगोमधील एक अत्यंत लोकप्रिय रेस्टॉरंट आहे, जिथे अनेक क्रीडा संघ आणि मान्यवर वारंवार भेट देतात. ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये 7 सुवर्ण आणि 3 रौप्य पदके जिंकून इतिहास रचणारा हिंदुस्थानी बॉक्सिंग संघ, आपले हे यश साजरे करण्यासाठी शनिवारी तिथे दाखल झाला होता.

 

आसामची रहिवासी असलेल्या लव्हलिना बोरगोहेनने राष्ट्रकुल खेळांमध्ये 75 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले. एका माध्यमाशी बोलताना लव्हलिना म्हणाली, “आम्ही एका हिंदुस्थानी रेस्टॉरंटमध्ये जेवत होतो, तेव्हा काही लोकांनी मला सांगितले की रेस्टॉरंटच्या नॅपकिन आणि लोगोवर छापलेल्या हिंदुस्थानच्या नकाशातून ईशान्य हिंदुस्थान गायब आहे आणि कश्मीरचा भागही चुकीचा आहे.”

 

लव्हलिना पुढे म्हणाली, “मला याबद्दल खूप वाईट वाटले आणि मी मालकांकडे माझी चिंता व्यक्त केली. रेस्टॉरंटच्या मालकांनी स्पष्ट केले की तो ब्रिटिश नकाशा होता, त्यामुळे ईशान्य भारत दिसत नव्हता. त्यांनी यासाठी माफी मागितली आणि नकाशा बदलण्याचे आश्वासन दिले.”

 

सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये, ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या लव्हलिनाने स्पष्ट केले की या घटनेमुळे तिला वैयक्तिकरित्या दुःख झाले आहे. ती म्हणाली, “कृपया याचा चुकीचा अर्थ घेऊ नका, पण मला खरंच खूप दुःख झाले आहे. ईशान्य हिंदुस्थानची नागरिक म्हणून, आम्हाला याचा खूप त्रास होतो.” मला फक्त एवढीच विनंती करायची होती की भविष्यात याची काळजी घेतली जावी.”

या कार्यक्रमाला उपस्थित असलेले भारतीय बॉक्सिंग फेडरेशनचे (बीएफआय) अध्यक्ष अजय सिंह यांनी सांगितले की, रेस्टॉरंट मालकांशी कोणताही वाद झाला नाही. ते म्हणाले, “कोणताही वाद किंवा भांडण झाले नाही. नकाशात एक चूक होती, जी मी आणि लव्हलिनाने त्यांच्या निदर्शनास आणली. त्यांनी आपली चूक मान्य केली आहे आणि लवकरच ती दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले आहे.”