Jammu Kashmir – बनिहालमध्ये अवैध घुसखोरांवर कारवाई; 21 बांगलादेशी नागरिक ताब्यात, अधिक तपास सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

हिंदुस्थानात अवैध घुसखोरांविरुद्धची कारवाई जोरात सुरू आहे. दरम्यान, जम्मू आणि कश्मीरमधील रामबन जिल्ह्यातील बनिहाल येथे पोलिसांनी शोधमोहिमेदरम्यान 21 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले. अटक केलेल्या व्यक्तींमध्ये पुरुष, महिला आणि अल्पवयीन मुलांचा समावेश होता. त्यांच्यापैकी कोणाकडेही हिंदुस्थानात प्रवेश करण्यासाठी किंवा राहण्यासाठी कोणतेही वैध कागदपत्र आढळले नाही.

 

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (2 ऑगस्ट) रामबन जिल्ह्यातील बनिहाल येथे नियमित तपासणी मोहिमेदरम्यान त्यांना थांबवण्यात आले. त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. ताब्यात घेतलेल्यांपैकी कोणाकडेही वैध पासपोर्ट, व्हिसा किंवा इतर कोणतेही ओळखपत्र किंवा प्रवासाचे कागदपत्र आढळले नाही, यावरून ते हिंदुस्थानात बेकायदेशीरपणे प्रवेश करत असल्याचे दिसून येते. यानंतर पोलिसांनी त्या सर्वांना ताब्यात घेतले.

 

टीव्ही 9 ने दिलेल्या वृत्तानुसार प्राथमिक चौकशीदरम्यान, या सर्व लोकांनी पोलिसांना सांगितले की त्यांनी आसाम सीमेवरून हिंदुस्थानात बेकायदेशीरपणे प्रवेश केला होता. त्यांनी आसामहून जम्मूपर्यंत रेल्वेने प्रवास केला आणि ते कामाच्या शोधात काश्मीरला जात होते. ते न्यू जलपाईगुडी, कटिहार, बरौनी, मुघलसराय, लखनौ, कानपूर आणि दिल्लीमार्गे जम्मू तवीला पोहोचले. तिथून ते रस्त्याने काश्मीरला जात होते.

 

पोलिसांच्या तपासात असे उघड झाले आहे की, ताब्यात घेण्यात आलेले सर्व 21 जण बांगलादेशातील सिल्हेट जिल्ह्याच्या विविध भागांतील रहिवासी आहेत. पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरू केली असून, त्यांच्या हिंदुस्थानातील बेकायदेशीर प्रवेशाचा मार्ग, मदतनीस आणि परिस्थिती निश्चित करण्यासाठी पुढील तपास करत आहेत. हे लोक हिंदुस्थानात येण्यासाठी कोणत्या मार्गाने आले आणि त्यांना कोणी मदत केली याचा तपास पोलीस आता करत आहेत. तपासानंतर पुढील कारवाई केली जाईल.

 

अटक केलेल्या व्यक्तींमध्ये इम्रान अहमद (18), मुस्तकीम अहमद (15), शुहाग अहमद (17), रुबिया बेगम (22), झहीर अहमद (3), झहीन अहमद (7), लिसा बेगम (20), फातिमा (6), मोहम्मद फहीम (2), आणि अक्लिमा बेगम (18) यांचा समावेश आहे. हे सर्व बांगलादेशातील सिल्हेट, राणीगंज आणि सुनामगंज जिल्ह्यांचे रहिवासी आहेत. तर मोहम्मद अलाउद्दीन (38), मोहम्मद अयाज अली (32) आणि सुहेल अहमद (28) हे सर्व बांगलादेशातील सिल्हेट जिल्ह्यातील सुनामगंजमधील सैदगावचे रहिवासी आहेत. रहिमुद्दीन (23), मोहम्मद आलमगीर (19) आणि रेहान अहमद (14) हे सिल्हेट जिल्ह्यातील सुनामगंजमधील सैदपूरचे रहिवासी आहेत. केवसर अहमद (26) आणि राजुल करीम (22) हे दोघेही पश्चिम रुकुनपूरचे रहिवासी आहेत. रसील अहमद (19), सहजुद्दीन अहमद (19), साबीर (19) हे सिल्हेतचे रहिवासी आहेत.