अमेरिकेच्या व्हिसासाठी लाखोंचा बॉण्ड, 50 देशांमध्ये हिंदुस्थानचा समावेश नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेने आपल्या व्हिसा बॉण्ड कार्यक्रमात कायमस्वरूपी बदल केला आहे. नवीन नियमानुसार काही देशांतील नागरिकांना व्यवसाय (बी 1) आणि पर्यटन (बी 2) व्हिसा मिळवण्यापूर्वी 20 हजार डॉलर्स (17 लाख) पर्यंतचा बॉण्ड भरावा लागणार आहे. हा नियम 50 देशांच्या नागरिकांना लागू असला तरी या देशांमध्ये हिंदुस्थानचा समावेश नाही. मात्र भविष्यात गरज भासल्यास इतर देशांचाही या योजनेत समावेश केला जाऊ शकतो.

अमेरिकन सरकारने फेडरल रजिस्टरमध्ये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार 3 ऑगस्टपासून हा निर्णय लागू होणार आहे. यानुसार व्हिसा अधिकारी आवश्यक वाटल्यास व्हिसा जारी करण्यापूर्वी कोणत्याही पात्र अर्जदाराला बॉण्ड सादर करण्यास सांगू शकतात. सध्या या यादीत बांगलादेश, नेपाळ आणि भूतान या देशांचा समावेश आहे. या योजनेचे सकारात्मक परिणाम दिसू लागल्याने ती कायमस्वरूपी करण्याचा निर्णय अमेरिकन सरकारने घेतला आहे. यापूर्वी या योजनेअंतर्गत 5 हजार, 10 हजार आणि 15 हजार डॉलरचा पर्याय अस्तित्वात होता, आता मात्र 5 हजार डॉलरचा पर्याय काढून टाकत कमाल रक्कम 20 हजार डॉलरपर्यंत वाढवण्यात आली आहे. या निर्णयामुळे अमेरिकेत व्हिसाची मुदत संपल्यानंतरही होणारे अवैध वास्तव्य रोखले जाणार असले तरी यामुळे व्यवसाय किंवा मनोरंजनासाठी अमेरिकेत येणाऱ्या अनेक खऱ्या प्रवाशांवरील आर्थिक भार वाढू शकतो.