एकाच सत्रात पेपर, प्रत्येक प्रश्नाला जादा वेळ; नीट-पीजी परीक्षेचे नियम बदलले! 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारने येत्या 30 ऑगस्ट रोजी होणाऱ्या नीटपीजी 2026 परीक्षेच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे बदल केले आहेत. यामध्ये जवळची परीक्षा केंद्रे आणि एकाच सत्रात पेपर प्रत्येक प्रश्नासाठी अधिक वेळ देणे आदींचा समावेश आहे.    

या बदलांमागील उद्देश परीक्षा अधिक निष्पक्ष, सुरक्षित आणि पारदर्शक बनवणे, तसेच उमेदवारांवरील ताण कमी करणे हा आहे. पेंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी नीट-पीजी 2026 च्या तयारीचा आढावा घेतला आणि अधिकाऱ्यांना ही परीक्षा कोणत्याही अडचणींशिवाय सुरक्षित व तंत्रज्ञान-आधारित पद्धतीने घेण्याचे निर्देश दिले. राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा मंडळाने परीक्षेच्या पद्धतीत सुधारणा करून 180 बहुपर्यायी प्रश्नांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यांची उत्तरे 210 मिनिटांत द्यावी लागतील.

परीक्षा अधिक निष्पक्ष आणि पारदर्शक

गेल्या काही वर्षांत परिस्थितीमुळे नीट-पीजी परीक्षा दोन सत्रांमध्ये घेतली जात होती, पण आता नीट-पीजी 2026 परीक्षा एकाच सत्रात घेतली जाणार आहे. एकाच सत्रात परीक्षा घेतल्याने सर्व उमेदवारांसाठी समान प्रश्न सुनिश्चित होतील आणि विद्यार्थ्यांचे अधिक निष्पक्ष व पारदर्शक मूल्यांकन होईल, असे संबंधित विभागाचे म्हणणे आहे.

कडक सुरक्षा व्यवस्था

नीट- पीजी 2026 परीक्षा अंदाजे 340 शहरांमध्ये आणि 1,300 हून अधिक परीक्षा केंद्रांवर एकाच शिफ्टमध्ये घेतली जाईल. परीक्षेसाठी 60,000 हून अधिक कर्मचारी तैनात केले जातील. सुरक्षा व्यवस्थेमध्ये परीक्षा पेंद्रांची पूर्व-तपासणी, सीसीटीव्ही पाळत, बायोमेट्रिक पडताळणी, उमेदवारांची झडती, सिग्नल जॅमर, संगणकांचे सुरक्षित वाटप आणि थेट देखरेख यांचा समावेश असेल.

या वर्षी नीट-पीजी 2026 साठी एकूण 273,183 उमेदवारांनी नोंदणी केली असून ही संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत 12.5 टक्क्यांहून जास्त आहे.

घराजवळच असणार परीक्षा केंद्रे

पूर्वी उमेदवारांना ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर केंद्रे दिली जात होती. आता परीक्षा केंद्र निवड प्रक्रियेत सर्वात मोठा बदल करण्यात आला आहे. नवीन बदलानुसार, उमेदवारांना त्यांच्या परीक्षा केंद्रासाठी त्यांच्या पसंतीची तीन राज्ये निवडावी लागतील. उमेदवारांना त्यांच्या राज्याला प्रथम प्राधान्य द्यावे लागेल. यामुळे उमेदवारांना त्यांच्या निवासस्थानाजवळ केंद्रे मिळतील. पूर्वी उशिरा नोंदणी करणाऱ्या उमेदवारांना दूरच्या राज्यांमध्ये प्रवास करावा लागत असे. आता उमेदवारांना 30 ऑगस्ट रोजी होणाऱ्या परीक्षेच्या सुमारे तीन आठवडे आधी त्यांच्या नेमून दिलेल्या परीक्षा शहराबद्दल माहिती दिली जाईल.