
श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी ‘टीम इंडिया’ला मोठा धक्का बसला आहे. संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेला मुकणार आहे. डाव्या गुडघ्याच्या दुखापतीतून तो अद्याप पूर्णपणे सावरलेला नसल्याने बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याला घाईने मैदानात न उतरवण्याचा सल्ला दिला आहे. त्याच्या जागी अद्याप कोणत्याही खेळाडूची घोषणा करण्यात आलेली नाही.
इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील १६ जुलैला कार्डिफ येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यानंतर बुमराने एकही सामना खेळलेला नाही. त्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना झालेल्या दुखापतीमुळे तो लॉर्ड्सवरील अखेरच्या सामन्यातही खेळू शकला नव्हता. इंग्लंड दौरा संपल्यानंतर बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने आखलेल्या दीर्घकालीन फिटनेस आराखड्यानुसार बुमराच्या गुडघ्यावर विशेष इंजेक्शन दिले होते. यानंतर तो बंगळुरू येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये फिटनेस चाचणीसाठी दाखल झाला. मात्र सध्या गोलंदाजीला सुरुवात केल्यास दुखापत अधिक गंभीर होऊन त्याला आणखी प्रदीर्घ काळ क्रिकेटपासून दूर राहावे लागू शकते, असे वैद्यकीय पथकाचे मत पडले.
आयपीएलपूर्वी मार्च महिन्यातही बुमराने सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये फिटनेस चाचणी दिली होती. त्यानंतर त्याने आयपीएलमध्ये १३ सामने खेळले पण मुंबई इंडियन्सचा अखेरचा सामना त्याने खेळला नव्हता.
दुखापतींचे ग्रहण
हिंदुस्थानी संघाची अडचण एवढ्यावरच थांबलेली नाही. हर्षित राणा (हॅमस्ट्रिंग), नितीश कुमार रेड्डी (क्वॉड्रिसेप्स), वॉशिंग्टन सुंदर (हॅमस्ट्रिंग) आणि आकाश दीप (पाठीच्या दुखापतीमुळे) हेही संघाबाहेर आहेत. त्यामुळे संघाला दुखापतींचे ग्रहण लागल्याने गोलंदाजी विभागावर मोठा ताण निर्माण झाला आहे.
इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर कर्णधार शुभमन गिलनेही खेळाडूंच्या वाढत्या दुखापतींबाबत चिंता व्यक्त केली होती. ‘प्रत्येक सामन्यानंतर एखादा खेळाडू दुखापतीमुळे बाहेर पडत असेल, तर संघाच्या फिटनेसमध्ये काहीतरी त्रुटी आहे. हीच परिस्थिती कायम राहिली तर २०२७च्या विश्वचषकात त्याचा मोठा फटका बसू शकतो.’ असे गिलने स्पष्ट केले होते.
हिंदुस्थान आणि श्रीलंका यांच्यातील पहिली कसोटी १५ ऑगस्टपासून गॉल येथे तर दुसरी कसोटी २३ ऑगस्टपासून कोलंबोच्या एसएससी मैदानावर खेळवली जाणार आहे. त्यापूर्वी ७ ऑगस्टपासून कोलंबो येथे तीन दिवसांचा सराव सामना होणार आहे.
श्रीलंका दौऱ्यासाठी हिंदुस्थानचा कसोटी संघ
शुभमन गिल (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋषभपंत (यष्टिरक्षक), बी. साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, मोहम्मद सिराज, प्रसिथ कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल आणि सारांश जैन




























































