
प्रवाशांची नेहमीच वर्दळ असणाऱ्या दादर रेल्वे स्थानकात तरुणाने लोकलच्या फूटबोर्डखाली स्वतःला झोकून देत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याचक्षणी प्लॅटफॉर्मवर गस्त घालणाऱ्या महिला पोलिसाने प्रसंगावधान दाखवले आणि तरुणाच्या पाय पकडून त्याला फूटबोर्डखालून बाहेर खेचले. त्यामुळे तरुणाचे प्राण वाचले. मानसिक तणावातून त्याने जीवन संपवण्याचे टोकाचे पाऊल उचलले होते. महिला पोलिसाने त्याचा केलेला थरारक बचाव सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. दादरसारख्या वर्दळीच्या स्थानकात घडलेल्या या घटनेने प्रचंड खळबळ उडाली.
पश्चिम रेल्वे मार्गावरील दादर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर 30 जुलैच्या रात्री 10 वाजून 52 मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. चर्चगेटहून बोरिवलीच्या दिशेने जाणारी धिमी लोकल दादर स्थानकातून सुटली होती. त्याचदरम्यान तरुणाने अचानक प्लॅटफॉर्मवर झोकून दिले आणि लोकल ट्रेनच्या फूटबोर्डखाली स्वतःचे डोके घुसवले. त्याचा हा आत्महत्येचा प्रयत्न निदर्शनास येताच रेल्वे पोलिस दलातील (जीआरपी) हेड कॉन्स्टेबल अनिता नरवडे यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि तरुणाचे पाय पकडून त्याला धावत्या लोकलपासून दूर प्लॅटफॉर्मवर खेचले. नरवडे यांनी केलेल्या थरारक सुटकेमुळे तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न अयशस्वी ठरून त्याचे प्राण वाचले. त्याला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. या घटनेने प्लॅटफॉर्मंवर खळबळ उडाली. नंतर तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. तरुणाच्या थरारक बचावाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
आत्महत्येच्या प्रयत्नामागील नेमके कारण अस्पष्ट
हेड कॉन्स्टेबल अनिता नरवडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशाकडे विचारपूस केली. तो प्रवासी मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. तो विवाहित असून गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. तो मुंबईत त्याच्या नातेवाईकाकडे राहत होता, अशी माहिती समोर आली आहे. त्याच्या आत्महत्येच्या प्रयत्नाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. हेड कॉन्स्टेबल नरवडे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे.




























































