विद्यार्थ्यांना ‘माफ करण्याची’ भाषा पंतप्रधान करतात; सरकारने त्यांची माफी मागून त्यांना न्याय द्यावा: राहुल गांधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
pm-speaks-of-forgiving-students-govt-owes-them-justice-apology-rahul

पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांना ‘माफ करण्याची’ भाषा करत आहेत. मात्र, प्रत्यक्षात सरकारने विद्यार्थ्यांना सत्य सांगावे, त्यांना न्याय द्यावा आणि त्यांची माफी मागावी, असे मत लोकसभेचे विरोधी पक्षनेते, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे.

तामिळनाडू दौऱ्यादरम्यान शनिवारी त्यांनी नीट (NEET) प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रकरणानंतर परीक्षा रद्द झाल्यामुळे आत्महत्या केलेल्या गोपिका, रोशिनी आणि वेत्री आनंदन यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्या भेटीचा व्हिडीओ रविवारी शेअर करत राहुल गांधी यांनी इन्स्टाग्रामवर ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले, ‘तामिळनाडू दौऱ्यात मी गोपिका, रोशिनी आणि वेत्री आनंदन या वैद्यकीय शिक्षणाची स्वप्ने पाहणाऱ्या तीन विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. नीट प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे परीक्षा रद्द झाली आणि त्यानंतर या तिघांनी आत्महत्या केली. प्रत्येक कुटुंबाच्या मनात एकच वेदनादायी प्रश्न होता – प्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांनी भ्रष्ट व्यवस्थेची शिक्षा का भोगावी?’

प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे परीक्षा रद्द झाली, विद्यार्थ्यांना पुन्हा नीट परीक्षा द्यावी लागली आणि त्यामुळे तरुणांच्या मनावर असह्य मानसिक ताण आला, असे गांधी यांनी म्हटले.

प्रत्येक आकड्यामागे एक स्वप्न पाहणारा विद्यार्थी आणि कधीही भरून न निघणारे दुःख घेऊन जगणारे एक कुटुंब आहे, असेही त्यांनी सांगितले.

‘मी त्यांच्या वेदना ऐकल्या. आमचा लढा अशा शिक्षण व्यवस्थेसाठी आहे, जिथे मेहनतीचा सन्मान होईल, परीक्षा पारदर्शक आणि निष्पक्ष होतील आणि संस्थांच्या अपयशामुळे एकाही विद्यार्थ्याला टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ येणार नाही’, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले.

‘पंतप्रधान विद्यार्थ्यांना ‘माफ करण्याची’ भाषा करतात. मात्र या पालकांचे दुःख ऐकल्यानंतर माझा विश्वास अधिक दृढ झाला आहे. भारतातील विद्यार्थ्यांना कोणाच्याही माफीची गरज नाही. उलट सरकारने त्यांना सत्य सांगावे, न्याय द्यावा आणि त्यांची माफी मागावी’, असा ठाम दावा राहुल गांधी यांनी केला.

या व्हिडीओमध्ये राहुल गांधी आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधताना दिसतात.

मामल्लापूरम येथे नीटच्या संदर्भात टोकाचे पाऊल उचललेल्या विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले, ‘आपल्या मुलाचे दुःख करणाऱ्या आई-वडिलांना पाहण्याइतके वेदनादायी दुसरे काहीच नाही.’

‘प्रत्येक गेलेल्या तरुण जीवामागे आयुष्यभर न भरून येणारे दुःख घेऊन जगणारे एक कुटुंब आहे आणि या मोडकळीस आलेल्या शिक्षण व्यवस्थेबद्दल अनेक गंभीर प्रश्न आहेत. प्रश्नपत्रिका फुटतात, परीक्षा रद्द होतात आणि अनेक वर्षांची मेहनत एका रात्रीत वाया जाते. विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे मेहनत करण्यास सांगितले जाते, पण व्यवस्था मात्र त्यांच्याशी प्रामाणिक राहत नाही.’

‘आपली मुले गमावलेल्या पालकांचे अश्रू आणि त्यांचा आक्रोश यापेक्षा मोठे दुःख असू शकत नाही. हे दुःख त्यांच्यासोबत आयुष्यभर राहणार आहे आणि त्याचबरोबर या भ्रष्ट व मोडकळीस आलेल्या शिक्षण व्यवस्थेबाबतचे अनेक प्रश्नही कायम राहतील’, असे त्यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले होते.

प्रश्नपत्रिका फुटणे आणि परीक्षा रद्द होण्याच्या घटनांचा उल्लेख करत ते म्हणाले, ‘पंतप्रधानांना विद्यार्थ्यांना माफ करण्याची भाषा करण्याचे धाडस तरी कसे होते?’

‘ज्या कुटुंबांनी आपली मुले गमावली, किंवा ज्यांची आयुष्यभराची बचत, वेळ आणि स्वप्ने प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे उद्ध्वस्त झाली, अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाची त्यांनी भेट घेतली आहे का? उत्तर आहे – नाही. भारतातील विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही; उलट मोदीजींनी त्यांची माफी मागायला हवी’, असे राहुल गांधी म्हणाले.

शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या एका व्हिडीओ संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीटमधील कथित गैरव्यवहारांविरोधातील आंदोलनादरम्यान जंतर-मंतर येथे स्वतःबरोबरच आपल्या दिवंगत आईविषयीही आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आल्याचे म्हटले होते. अशा ‘दिशाभूल झालेल्या मुलांना’ न्यायालयात खेचून प्रश्न सुटणार नाही, त्यामुळे आपण त्यांना माफ करू इच्छितो, असेही त्यांनी त्या संदेशात सांगितले होते.