
अहिल्यानगर शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे शहरातील खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, अन्न व औषध प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
बाबासाहेब आव्हाड यांनी माळीवाडा बसस्थानकाजवळील एका हातगाडीवरून चिक्कीची तीन पॅकेट खरेदी केली. त्यापैकी एक पॅकेट उघडताच त्यामध्ये मोठय़ा प्रमाणात जिवंत अळ्या आढळल्या. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी संबंधित विक्रेत्याकडे जाब विचारला. त्यावेळी चिक्कीचा माल माळीवाडा परिसरातील एका किराणा दुकानातून आणल्याचे हातगाडी चालकाने सांगितले.
या घटनेनंतर शहरात मुदतबाह्य, बुरशी लागलेले व निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ खुलेआम विकले जात असल्याच्या तक्रारी पुन्हा एकदा ऐरणीवर आल्या आहेत. अन्न व औषध प्रशासनाकडून नियमित तपासण्या होत नसल्याने अशा प्रकारांना आळा बसत नसल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर राज्यभर भेसळखोरांविरोधात धडक कारवाया सुरू केल्या आहेत. अलीकडेच दूध भेसळ प्रकरणात झालेल्या कारवाईनंतर या चिक्की प्रकरणातही प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


























































