दादर टी.टी. येथे मॅनहोलची जाळी चोरण्याचा प्रयत्न, नागरिकांच्या आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साकीनाका येथे मॅनहोलवर जाळी बसवण्याच्या कामादरम्यान कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे अस्लम शेख या निष्पाप व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला होता. ही घटना ताजी असतानाच, आता दादरसारख्या गजबजलेल्या भागात मॅनहोलचे झाकण उघडून आतील लोखंडी जाळी चोरण्याची गंभीर घटना घडली आहे.

रविवारी सकाळी दादर पूर्वेतील खोदादाद सर्कल येथे काही अज्ञातांनी मॅनहोलच्या चेंबरचे झाकण उघडून, ते तोडून आतील लोखंडी संरक्षक जाळी (ग्रील) चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र ही जाळी थेट चेंबरच्या आत पडल्यामुळे त्यांना ती बाहेर काढता आली नाही. तोपर्यंत सकाळी रस्त्यावर नागरिकांची आणि वाहनांची वर्दळ सुरू झाली. पकडले जाण्याच्या भीतीने चोरटय़ांनी उघडे मॅनहोल तसेच सोडून घटनास्थळावरून पळ काढला.

काही वेळातच त्या ठिकाणी आलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आणि नागरिकांच्या हे उघडे आणि धोकादायक मॅनहोल निदर्शनास आले. कर्मचाऱ्यांनी याची माहिती महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाला दिली. माहिती मिळताच एफ उत्तर आणि पर्जन्य जलवाहिनी विभागातील संबंधित कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चेंबरमध्ये पडलेली लोखंडी जाळी बाहेर काढून ती पूर्ववत व्यवस्थित बसवली आणि मॅनहोलचे झाकण  बंद केले.

या गंभीर प्रकारानंतर महापालिकेच्या वतीने माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला आहे.