
जर संघातून दुसरा आवाज निघत असेल तर याचा अर्थ मोदी शहांनी माणसं पेरलेली आहेत, अशी टीका शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच इन्स्टाग्राम आणि एक्सवरच संसद चालवायची होती मग मोदींनी 20 हजार कोटी रुपये खर्च करून नवीन संसद कशासाठी उभी केली? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला.
दिल्लीत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, सगळ्यांनी ठरवून आता एक जाहिरात द्यायची. गुमशुदा की तलाश. देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हरवले आहेत. दोन आठवडे झाले, संसदेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे खासदारांना दर्शन झालेले नाही. मग संसद कशाकरता चालवत आहात? इन्स्टाग्रामवर, एक्सवरच संसद चालवा मग. नरेंद्र मोदींनी 20 हजार कोटी रुपये खर्च करून नवीन संसद कशासाठी उभी केली? याचे उत्तर त्यांना द्यावे लागेल. जर तुम्ही संसदेत यायला घाबरत असाल मग नवीन संसद बांधलीच कशाला? मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले अशी पाटी लावायची होती म्हणून नवीन संसद बांधली का? जे पंतप्रधान देशाच्या संसदेत यायला घाबरतात त्यांना देशाच्या पंतप्रधानपदी राहण्याचा नैतिक अधिकार आहे का? जे गृहमंत्री मोठ्या मोठ्या बाता मारतात, ई़डी, सीबीआयच्या धमक्या देतात. ते संसदेच्या सभागृहात यायला घाबरतात. त्यांना देशाच्या गृहमंत्रीपदी राहण्याचा अधिकार खरोखर आहे का? याचे आत्मचिंतन हे भाजपच्या खासदारांनी आणि पुढाऱ्यांनी करायला हवं. आज आम्ही पुन्हा त्यांना बोलावण्याचा प्रयत्न करू आणि त्यांचा राजीनामा मागण्याचा उपक्रम सुरुच ठेवू. हे महाशय परवा पुण्यात होते. रात्रीच्या काळोख्यात ते पुण्यात आले तिथे त्यांच्याविरोधात निदर्शनं झाली. आज दिल्लीतही त्यांच्याविरोधात निदर्शनं सुरू आहेत. अमित शहांनी जनतेला सामोरं गेलं पाहिजे. तुम्हाला जर खरोखर जनतेने निवडून दिलं असेल तर तुम्ही लोकांसमोर जायला पाहिजे. आणि जर तुम्ही चोऱ्या माऱ्या करून, मत चोरी करून, दहशतीच्या मार्गाने निवडून आले असाल तर ती दहशत तुम्हाला छळत आहे, असे संजय राऊत म्हणाले.
कोणतेही आंदोलन हे घटनाविरोधी असू शकत नाहीत. मुळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जो इतिहास आहे, त्यांची जी विचारधारा आहे, ते भारतीय संविधानाला मानत नाहीत, ते भारतीय तिरंग्याला मानत नाहीत. ते भारताच्या स्वातंत्र्याला मानत नाहीत. 52 वर्ष त्यांनी आपल्या कार्यालयात तिरंगा फडकावला नव्हता. संघाला स्वतंत्र संविधान निर्माण करायचं आहे, हे सगळ्यांना माहित आहे. म्हणून त्यांना 850 खासदारांचे बळ निर्माण करून भारताचं संविधानच संपवायचं आहे. म्हणून हे आंदोलन संविधान विरोधी आहे असं म्हणणं हे बाबासाहेबांच्या संविधानाचा अपमान आहे. मग भाजपने केलेली आंदोलनं संविधानाच्या कुठल्या चौकटीत होती? 1975 चं जयप्रकाश नारायण यांचं आंदोलन हे संविधानाच्या कोणत्या चौकटीत होतं? हे संघाचे महनीय पुढारी आहेत, त्यांनी हे देशाला सांगायला पाहिजे. भाजपचे सर्व लोक देश चालवताना संविधानाचा आदरच करायला तयार नाहीत. या देशातला तरुण जंतरमंतरवर जमला आणि एका भ्रष्ट शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागितला. ज्यांच्यामुळे 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, त्याचा राजीनामा मागणं जर कुणाला घटनाबाह्य वाटत असेल तर त्या माणसाची मानसिकता तपासावी लागेल, असे संजय राऊत म्हणाले.
अतुल लिमये यांच्या विधानावर सरसंघचालक सहमत आहेत का? आमचा पराभव करण्यासाठी लिमये यांनी महाराष्ट्रात 80 हजार कॉर्नर सभा घेतल्या होत्या. त्यामुळे ते अशा प्रकारची वक्तव्य करू शकतात. सरसंघचालकांना माझं आवाहन आहे, जंतर मंतरवरचं आंदोलन हे संविधानविरोधी आहे की नाही यावर त्यांनी भाष्य करावं. कारण जेन झी च्या भावना समजून घेतल्या पाहिजेत असं वक्तव्य सन्माननीय, परमपुज्य सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी केलं होतं आणि ते योग्य होतं. आणि जर संघातून दुसरा आवाज निघत असेल तर याचा अर्थ मोदी शहांनी माणसं पेरलेली आहेत असेही संजय राऊत म्हणाले.
दान चोरीविरोधात आवाज उठवणं हे सुद्धा असंविधानिक आहे का? हे संघाच्या पुढाऱ्यांना विचारा. राम मंदिर ट्रस्ट भाजपच्या ताब्यात आहे. संघ, भाजप सोडून सर्व हिंदू समाजाने राम मंदिरासाठी बलिदान दिलेले आहे. तिथे 1400 कोटी रुपायांची चोरी होते, 550 कोटी रुपयांची दानपेटी चोरीला जाते, त्याच्याविरोधात चाकू हल्ला होतो आणि संघाचे लोक त्या चाकू हल्ल्याचे समर्थन करतात, हे संघाचे किती अधःपतन सुरू आहे, याचे हे उत्तम उदाहरण आहे. ज्या संघाकडे आम्ही नितीमान आणि आदर्श संस्था म्हणून पाहत होतो, ते चाकू हल्ल्याचे समर्थन करतात. म्हणजे राम मंदिरच्या दान चोरीला संघाचा पाठिंबा आहे का? ज्या प्रकारच्या चोऱ्या राम मंदिरात झाल्या, त्या संघाच्या संमतीने झाल्या असं आम्ही समजायचं का? असे संजय राऊत म्हणाले
लाडकी बहीण योजना आणि कर्जमाफी योजना या दोन्ही फसव्या आहेत. हे भुलभुलैय्या आहे, यावर तज्ज्ञ शेतकरी लवकरच बोलतील. कुणी पालकमंत्री बदलला म्हणून नाशिककरांच्या जीवनातले खड्डे दूर होणार असतील, तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विचार करावा. सध्या नाशिकची जबाबदारी ही भाजपच्या चंपतरायकडे आहे. त्यामुळे हे खड्डे वाढत आहेत आणि भ्रष्टाचार वाढतोय हे खरं आहे. नाशिकच्या चंपतराय यांचे लक्ष खड्ड्यांपेक्षा कंत्राटदार आणि कमिशनबाजीकडे जास्त आहे.
तरुणांनी पंतप्रधान मोदींकडे दया याचना केलेली नाही. कुणीही माफी मागितलेली नव्हती. तुम्ही कोण माफ करणारे. आजही जेन झी लढण्यासाठी तयार आहेत. ही सगळी नौटंकी आहे. आणि मोदीजींची ही नौटंकी सुरूच राहणार. काही महिने त्यांना आता सहन करावं लागणार. ज्या मुलांना पकडून, दबाव टाकून माफी मागायला लावत आहेत त्याने काहीही होणार नाहिये. जेन झीला चिरडणे अशक्य आहे, असेही संजय राऊत यांनी नमूद केले.




























































