प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराने बंगळूरच्या व्हाईटफिल्डमधील शो केले रद्द, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराने बंगळूरच्या व्हाईटफिल्ड परिसरातील आपले शो रद्द केले आहेत. हिंदू संघटनांकडून होणाऱ्या मोठ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर कुणालने बंगळूरमधील आपले शो रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, कुणाल कामरा रविवारी स्वतः व्हाईटफील्ड पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. तिथे त्यांनी पोलिसांना माहिती दिली की, सध्याच्या परिस्थितीमुळे त्यांनी आपले नियोजित शो रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

एबीपी न्यूज ने दिलेल्या वृत्तानुसार हिंदू राष्ट्र समन्वय समितीने बंगळूरु पोलिसांकडे एक याचिका सादर करून, 3 ऑगस्ट रोजी उरू व्हाईटफील्ड येथे होणारा त्यांचा शो रद्द करण्याची मागणी केल्यानंतर कुणालने हे पाऊल उचलले. समितीने म्हटले आहे की, या कार्यक्रमामुळे कायदा आणि सुव्यवस्थेत अडथळा येऊ शकतो आणि धर्मनिरपेक्षतेला हानी पोहोचू शकते. त्यांनी असाही आरोप केला की, कामरा यांनी आपल्या पूर्वीच्या वक्तव्यांमध्ये हिंदू देवतांचा अपमान केला होता.

कुणाल कामराने सोशल मीडियावर आपले शो रद्द केल्याची घोषणा केली. प्लॅटफॉर्म एक्सवर माहिती देताना, त्याने जाहीर केले की सोमवार ते गुरुवार दरम्यान नियोजित असलेले त्याचे शो आता कोरमंगला येथील नवीन ठिकाणी हलवण्यात आले आहेत. त्याने प्रेक्षकांना माहिती दिली की, व्हाईटफील्ड शोच्या तिकिटांचे पैसे बुकमायशो (BookMyShow) द्वारे परत केले जातील. नवीन ठिकाणी मर्यादित आसनव्यवस्था असल्याने, त्याने चाहत्यांना कोरमंगला शोसाठी शक्य तितक्या लवकर तिकिटे बुक करण्याचे आवाहनही केले.