
आखाती देशातील संघर्ष, जागतिक अशांतता आणि अमेरिकन फेडरल बँकेच्या निर्णयाचा शेअर बाजार आणि सोनेचांदीच्या किमतीवर परिणाम झाला आहे. अमेरिका-इराण संघर्ष थंडावण्याचे संकेत मिळत असल्याने शेअर बाजारात सोमवारी जबरदस्त तेजी दिसून आली. त्याचप्रमाणे कच्च्या तेलाच्या किमतीतही मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे सोनेचांदीला बळकी मिळाली आहे.
आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंग दिवशी सोमवारी वायदे बाजारात (MCX) व्यवहार सुरू होताच सोने आणि चांदीच्या दरात लक्षणीय बदल दिसून आला. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती अचानक वाढल्या. गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमती घसरल्या होत्या. मात्र, ही वाढ झाल्यानंतरही सोनेचांदी अजूनही त्यांच्या उच्चांकापेक्षा स्वस्त आहेत.
सोमवारी एमसीएक्स (MCX) चांदीच्या दरात झालेला बदल पाहता ४ सप्टेंबर रोजी मुदत संपणाऱ्या या मौल्यवान धातूने २,१७,१९८ रुपयांच्या मागील बंद दरावरून उसळी घेत २,१८,७०९ रुपयांवर व्यवहार केला. याचा अर्थ, एकाच झटक्यात प्रति किलो १५११ रुपयांनी वाढ झाली.
गेल्या आठवड्यात, वायदे बाजारात चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. २४ जुलै रोजी १ किलो चांदीचा दर २,२२,१३८ रुपये होता, जो गेल्या शुक्रवारी घसरून १,१७,१९८ रुपये प्रति किलो झाला. याचा अर्थ असा की, आठवड्याच्या पाच ट्रेडिंग दिवसांमध्ये १ किलो चांदीची किंमत ४,९४० रुपयांनी घसरली. ही वाढ होऊनही, ती अजूनही तिच्या उच्चांकापेक्षा खूपच स्वस्त आहे. जानेवारीमध्ये चांदीच्या किमतीने प्रथमच ४ लाख रुपयांचा टप्पा ओलांडून ४,२०,०४८ रुपयांचा उच्चांक गाठला होता. सध्याच्या किमतीशी तुलना करता, चांदी अजूनही प्रति किलो २,०१,३३९ रुपयांनी स्वस्त आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वरील सोन्याच्या किमतीतील बदल पाहिल्यास, त्याच्या दरातही वाढ दिसून आली आहे. गेल्या आठवड्यातील शेवटच्या ट्रेडिंग दिवशी, शुक्रवारी, ५ ऑगस्ट रोजी मुदत संपणाऱ्या २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅम भाव १,४१,५११ रुपयांवर बंद झाला आणि सोमवारी तो १,४१,८२० रुपयांवर पोहोचला होता. गेल्या आठवड्यात सोन्याच्या भावात घसरण झाली होती.
चांदीप्रमाणेच, गेल्या आठवड्यात वायदे बाजारात सोन्याच्या भावातही एकूण घसरण दिसून आली. २४ जुलै रोजी त्याचा बंद भाव प्रति १० ग्रॅम १,४३,१०६ रुपये होता. शुक्रवारी या मौल्यवान धातूचा भाव १,४१,५११ रुपयांवर बंद झाला. गेल्या आठवड्यातील पाच ट्रेडिंग दिवसांमध्ये सोन्याच्या भावात प्रति १० ग्रॅम १,५९५ रुपयांची घसरण झाली होती.





























































