E20 पेट्रोल विरोधात 2 लाख नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन, केजरीवाल यांचा पंतप्रधानांच्या निवासस्थानावर मंगळवारी धडक मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानात सक्तीच्या करण्यात आलेल्या ‘E20 पेट्रोल’ ( इथेनॉल मिश्रण) धोरणाविरोधात ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आक्रमक झाले आहेत. इंधनाच्या या मुद्द्यावरून अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाखाली येऊन मोदी सरकार हे इथेनॉल-मिश्रित इंधन जनतेवर लादत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या धोरणाविरोधात मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानावर जाऊन आपण स्वतः निवेदन देणार असल्याची घोषणा केजरीवाल यांनी केली.

अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, लोकांच्या वाहनांचे नुकसान होत असूनही सरकार या इंधनाचा आग्रह धरत आहे. यामागे नक्कीच सरकारचा काहीतरी ‘छुपा अजेंडा’ आहे. पंतप्रधान मोदी हे ट्रम्प यांच्या दबावाखाली अमेरिकेकडून इथेनॉल खरेदी करत आहेत, अशी लोकांमध्ये चर्चा आहे. त्यामुळे लोकांच्या गाड्यांमध्ये बिघाड होत असूनही केंद्र सरकार हे धोरण राबवत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला.

पंतप्रधानांना देणार 2 लाख लोकांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन
E20 पेट्रोलमुळे वाहनांचे होणारे नुकसान आणि इतर समस्यांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांना दिलेल्या पत्राला कोणताही प्रतिसाद न मिळाल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. यामुळे आम्ही सुरू केलेल्या इथेनॉल मिश्रित पेट्रोलविरोधात स्वाक्षरी मोहीमचे निवेदन घेऊन पंतप्रधानांना ते सुपूर्द करणार असून यामध्ये तब्बल 2 लाखांहून अधिक नागरिकांनी स्वाक्षऱ्या केल्याची माहिती केजरीवाल यांनी दिली.