
पिंपरी-चिंचवडमधील मोरवाडी परिसरात एका उच्चशिक्षित कुटुंबाने आर्थिक विवंचनेतून सामूहिक आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. घरात पेटत्या कोळशावर सोडियम नायट्रेट हे विषारी रसायन ओतून, त्यातून निर्माण झालेल्या धुराचा श्वास घेत या कुटुंबाने आपले जीवन संपवले. या दुर्दैवी घटनेत कुटुंबप्रमुख विनोद पिल्लई (वय ५०), त्यांची पत्नी शैलेजा आणि एकुलती एक मुलगी पौर्णिमा (वय १९) या तिघांचाही मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे केरळचे असलेले पिल्लई कुटुंब अत्यंत उच्चशिक्षित होते. विनोद पिल्लई यांनी आयआयएम, अहमदाबाद या देशातील प्रतिष्ठित संस्थेतून शिक्षण घेतले होते. त्यांच्या पत्नी एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत समन्वयक म्हणून कार्यरत होत्या. तर त्यांची मुलगी पौर्णिमा ही कॉम्प्युटर सायन्सच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. एकेकाळी नेहरूनगर भागात स्वतःच्या मालकीच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या या कुटुंबावर गेल्या काही काळापासून मोठे आर्थिक संकट ओढवले होते. नाईलाजाने स्वतःचे घर विकून त्यांना मोरवाडीत भाड्याच्या घरात राहायला यावे लागले होते. त्यातच काही महिन्यांपूर्वी विनोद यांची नोकरी गेली आणि मूळ गावी सुरू असलेल्या घराच्या बांधकामामुळे आर्थिक ताण अधिकच असह्य झाला.
पैशांच्या सततच्या चिंतेतून आणि वाढत्या नैराश्यातून या कुटुंबाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या आत्महत्येचे तब्बल दीड महिन्यांपासून नियोजन सुरू होते. विनोद यांनी १ जून रोजीच ऑनलाईन माध्यमातून सोडियम नायट्रेट हे अत्यंत घातक आणि प्रतिबंधित रसायन मागवून ठेवले होते. शुक्रवारी रात्री सर्वांनी मिळून घरात कोळशे पेटवले आणि त्यावर हे रसायन ओतले. यातून खोलीभर पसरलेला विषारी धूर श्वासावाटे शरीरात गेल्याने विनोद यांचा जागीच मृत्यू झाला. बेशुद्धावस्थेत असलेल्या शैलेजा आणि पौर्णिमा यांना तात्काळ वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र रविवारी उपचारादरम्यान त्यांचीही प्राणज्योत मालवली.
दरम्यान, घटनास्थळी संत तुकाराम नगर पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली आहे. “आम्ही स्वेच्छेने आणि केवळ आर्थिक विवंचनेमुळे हे पाऊल उचलत असून, यासाठी इतर कोणालाही जबाबदार धरू नये,” असे त्यात नमूद करण्यात आले आहे. इतक्या उच्चशिक्षित कुटुंबाने अशा वेदनादायी मार्गाने जीवन संपवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस सध्या पिल्लई कुटुंबाचे मोबाईल आणि इंटरनेट रेकॉर्ड तपासत असून, या प्रकरणाचा पुढील तपास संत तुकाराम नगर पोलीस करत आहेत.































































