
संस्कृती शिकवणाऱ्यांनी बृजभूषण यांना मिळालेली क्लीन चीट कुठल्या संस्कृतीत बसते ते सांगावे, असा सवाल शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान ज्या पद्धतीची वागणूक जेन झी ला मिळाली ती ते विसरणार नाहीत असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
आज आदित्य ठाकरे यांनी मुंबईतल्या SRA कार्यालयाला भेट दिली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले की, वरळीमध्ये अनेक गृहनिर्माण प्रकल्प मार्गी लागलेले आहेत. SRA च्या अनेक योजना या वर्षानुवर्ष रखडल्या होत्या त्या आम्ही मार्गी लावल्या आहेत. आता व्हिपी नगर आणि आजूबाजूच्या भागाचा विकास आता बाकी आहे. या भागाचा विकास कुठे अडला आहे यासाठी आम्ही SRA च्या कार्यालयाला आम्ही भेट दिली, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
सरकारच्या नजरेत शेतकरी हे गुन्हेगार असतात. म्हणून ते सतत कर्जमुक्ती ऐवजी कर्जमाफी म्हणत असतात. उद्यापासून सरकार कर्जमाफीचे पैसे वितरित करतील त्याबाबत काहीच कल्पना नाही. शेतकऱ्यांची मदत व्हावी अशी आमची इच्छा आहे म्हणून इतक्यात बोलणं योग्य ठरणार नाही.
फक्त गडकरीच नव्हे तर पंतप्रधान मोदींच्या विरोधातही देशात रोष आहे. गेल्या 12 वर्षात देशाची आर्थिक, सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रातही घोळ झालेले आहेत. भाजपला सरकार चालवता येत नाही. भाजपच्या काळात किती दहशतवादी हल्ले झालेत हे दिसतंय आपल्याला. हे सगळं होऊन जनतेने फक्त त्यांची भाषणं ऐकायची, रील्स पहायचे आणि पुढे यावर काहीही होत नाही. इथेनॉलमुळे किती जणांच्या गाड्या खराब झाल्या आहेत. मुंबई गोवा हायवे अद्याप झालेला नाही.
भाजपला स्वतःचं संविधान या देशावर लादायचं आहे, म्हणूनच त्यांना दोन तृतीयांश बहुमत हवंय. मतदारसंघ पुनर्रचना हा बहाणा आहे, जनतेला मिळालेले जे हक्क आहेत ते काढून घ्यायचे आहेत.
सरसंघचालक मोहन भागवत 6 ऑगस्ट रोजी जेन झीसोबत संवाद साधणार आहेत. पण हाच संवाद विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यापूर्वी, अश्रूधुरांचा मारा करण्यापूर्वी, तरुण मुला मुलींना ट्रोल्संनी हैराण करण्यापूर्वी, माफी मागायला लावण्यापूर्वी केला असता तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याची वेळ आली नसती. हा संवाद फार उशिरा होत आहे. देर आये पण दुरुस्त नही आये असा याचा अर्थ होतो. जेन झी ला ज्या पद्धतीने मारहाण करण्यात आली आणि ज्या पद्धतीने 50 ग्रॅम खिशात ठेवू अशी धमक्या दिल्या होत्या हे सर्वकाही जेन झी विसरणार नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
ब्रिजभूषण शरण सिंग यांची लैंगिक छळ प्रकरणात निर्दोष मुक्तता झाली आहे. यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, गेल्या 10 दिवसांपूर्वी आम्हाला संस्कृती आणि भाषा शिकवत होते, त्यांना प्रश्न विचारला पाहिजे की हे कुठल्या संस्कृतीत बसतं.
वाराणसीत पंतप्रधान मोदींच मताधिक्क्य घटलं होतं, कारण कॉरिडॉरच्या नावाने जुनी मंदिर तोडली, पुजाऱ्यांची घरं तोडली. फक्त राजकारणासाठी अयोध्येत राम मंदिर अपूर्ण असताना सुरु केलं गेलं. त्याच मंदिरातून देणगी चोरी झाली. ही भाजपची हिंदुविरोधी बाब आहे ती सगळीकडे दिसते, असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.




























































