आंदोलकांवरील कारवाई आणि राम मंदिर देणगी चोरीप्रकरणी सरकारला उत्तर द्यावे लागेल – मल्लिकार्जुन खरगे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी संसदेत केंद्र सरकारकडे दोन प्रमुख मुद्द्यांवरून स्पष्टीकरणाची मागणी केली आहे. २० जुलै रोजी आंदोलकांवर झालेली पोलिसांची कारवाई आणि अयोध्येतील राम मंदिराच्या देणगी चोरीप्रकरणी खरगे यांनी मोदी सरकारला घेरले आहे. ANI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर मल्लिकार्जुन खरगे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर विरोधी पक्षांच्या मागण्या मांडल्या. केंद्रीय गृहमंत्र्यांनी संसदेत येऊन विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज आणि पेलेट गनच्या वापराबाबत स्पष्टीकरण द्यायला हवे, अशी पहिली मागणी त्यांनी केली. तसेच राम मंदिर ट्रस्टवर खुद्द पंतप्रधानांची देखरेख असतानाही मंदिराला मिळालेली देणगी आणि निधीची चोरी कशी झाली, याचे उत्तर पंतप्रधानांनी देशाला द्यायला हवे, असा सवाल खरगे यांनी उपस्थित केला.

कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) नेतृत्वाखाली २० जुलै रोजी काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान दिल्ली पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज करत पेलेट गनचा वापर केला होता, असा आरोप आहे. या घटनेवरून विरोधकांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. शहा यांच्या संसदेतील अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसद परिसरात जोरदार निदर्शने केली. यावेळी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्यासह अनेक खासदारांनी ‘अमित शहा संसदेतून गायब का?’ असा मजकूर असलेला मोठा बॅनर झळकावला. तसेच ‘अमित शहा उत्तर द्या’ आणि ‘अमित शहा कुठे गायब आहेत?’ अशा घोषणाही देण्यात आल्या.