संपूर्ण यंत्रणा त्यांना वाचवण्यात लागली होती, ब्रिजभूषण यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर विनेश फोगाटने व्यक्त केला संताप; प्रियांका गांधींनीही सरकारवर केली टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माजी डब्ल्यूएफआय अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांची दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने लैंगिक छळ प्रकरणात निर्दोष मुक्तता केली आहे. या निकालानंतर कुस्तीपटू विनेश फोगाट आणि काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी सरकार व यंत्रणेवर जोरदार टीका केली आहे.

टीव्ही९ भारतवर्षच्या वृत्तानुसार, या निकालावर तीव्र दुःख आणि संताप व्यक्त करताना विनेश फोगाट म्हणाली की, सत्ताधारी पक्षाच्या एका बाहुबली नेत्याविरोधात रस्त्यावर उतरण्यासाठी आणि एफआयआर दाखल करण्यासाठी आम्हाला खूप हिंमत एकवटावी लागली होती. सत्तेच्या आणि बाहुबलाच्या जोरावर ब्रिजभूषण यांनी अनेक मुलींना घाबरवून तक्रारीतून नावे मागे घेण्यास भाग पाडले. तरीही अनेक महिला कुस्तीपटू खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि कोर्टात लढा दिला.

विनेशने आरोप केला आहे की, पहिल्या दिवसापासूनच सरकार आणि संपूर्ण यंत्रणा ब्रिजभूषण यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. कोर्टाने त्यांना दोषी न मानल्याचे दुःख असले तरी कुस्तीपटूंनी आशा सोडलेली नाही. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील करण्याच्या सूचना वकिलांना देण्यात आल्या असून हा लढा पुढेही सुरूच राहील, असा निर्धार तिने व्यक्त केला.

हे महिला सक्षमीकरणाच्या बाता मारतात – प्रियांका गांधी

या मुद्द्यावरून काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. “एकीकडे हे सरकार युवा पिढीसोबत असल्याचा दावा करते, महिला सक्षमीकरण आणि महिला आरक्षणाच्या मोठ्यामोठ्या बाता मारते, मात्र दुसरीकडे प्रत्यक्ष वास्तव काय आहे, हे आज आपल्या सर्वांसमोर आहे,” असे त्या म्हणाल्या.