
राम मंदिरातील देणगी चोरीच्या प्रकरणावरून आज पुन्हा एकदा संसद परिसरात विरोधी पक्षांच्या नेत्यांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी विरोधकांकडून एक प्रतिकात्मक दानपेटी ठेवण्यात आली होती, ज्यावर ‘चंदा चोरी’ असे पोस्टर लावण्यात आले होते. समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांनी या दानपेटीत पैसे टाकून सरकारविरोधात निषेध नोंदवला आणि जोरदार घोषणाबाजी केली. टीव्ही९ भारतवर्षने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
या प्रकरणावरून समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांनी सरकारवर कडाडून टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, राम मंदिराच्या देणगीतील चोरी आणि जमिनीच्या घोटाळ्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असून आजतागायत या प्रकरणी एकावरही एफआयआर का दाखल करण्यात आला नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जनतेने रामलल्लाच्या चरणी श्रद्धेने अर्पण केलेला पैसा आणि मौल्यवान धातू नेमके गेले कुठे, याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे. लोकांमध्ये सरकारबद्दल मोठी निराशा असून मूळ मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी सरकारकडून वेगवेगळे प्रयत्न केले जात असल्याचे त्या म्हणाल्या.




























































