
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टच्या पालकत्व पदाचा राजीनामा दिला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी राजीनामा दिला असल्याचे सांगण्यात आले असले तरी त्यामागील खरे कारण मंदिराच्या दानपेटय़ांत झालेला कोटय़वधींचा घोटाळा हेच असल्याची चर्चा आहे.
गेल्या काही महिन्यांपासून अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या देणगी घोटाळय़ाची जगभर चर्चा चालू आहे. या प्रकरणात काही जणांना अटक करण्यात आली असून मुख्य विश्वस्त चंपत राय यांनीही राजीनामा दिला आहे. देणगी घोटाळय़ाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या एसआयटीच्या अहवालानंतर या घडामोडी घडल्या. मात्र चंपत राय यांचा राजीनामा आणि काही जणांच्या अटका एवढय़ापुरताच हा घोटाळा मर्यादित नसून कारवाईपासून मोठय़ा माशांना वाचवण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जोशी यांनी राजीनामा दिल्याने चर्चा रंगल्या आहेत.
कारभारावर देखरेख
भैयाजी जोशी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपमधील संवादाचा पूल समजले जातात. राम मंदिराचे पालक हे पद प्रशासकीय जबाबदाऱ्यांपासून मुक्त होते, मात्र ट्रस्टच्या संपूर्ण कारभारावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी पालक म्हणून भैयाजी जोशी यांच्यावर होती.
आंदोलकांवरील कारवाई आणि राम मंदिर लूट सरकारला उत्तर द्यावे लागेल – खरगे
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. दिल्लीच्या जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेला अमानुष लाठीमार आणि पॅलेट गनच्या वापराबाबत बाबत केंद्रीय गृहमंत्र्यांनी संसदेत येऊन स्पष्टीकरण द्यायला हवे, अशी मागणी खरगे यांनी केली. तर, राम मंदिरातील देणगी आणि निधीची चोरी कशी झाली, याचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला द्यावे, असे खरगे म्हणाले.




























































