
महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी भाजपचे माजी खसदार बृजभूषण शरण सिंह यांना दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू येथील सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले. न्यायालयाच्या निर्णयावर असामाधान व्यक्त करत या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी स्पष्ट केले.
बृजभूषण यांच्याविरोधात 6 महिला कुस्तीपटूंनी तक्रार केली होती. त्यात एका अल्पवयीन कुस्तीपटूचाही समावेश होता. मात्र, त्यांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल झाले नव्हते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एप्रिल 2023 मध्ये बृजभूषण यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र अल्पवयील महिला कुस्तीपटूने तक्रार मागे घेतली होती.
याप्रकरणी 10 मे 2024 रोजी दिल्ली पोलिसांच्या आरोपपत्रानुसार आरोप निश्चित करण्यात आले होते. या खटल्यात 127 वेळा सुनावणी झाली. त्यात 32 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. त्यानंतर 2 जुलै रोजी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अश्विनी पवार यांनी निकाल राखून ठेवला होता. आज त्यांनी बृजभूषण सिंह यांच्यासह सहआरोपी विनोद तोमर यांचीही निर्दोष मुक्तता केली.
जंतर मंतरवर केले होते आंदोलन
महिला कुस्तीपटूंनी दिल्लीच्या जंतर मंतर येथे बृजभूषण सिंह यांच्याविरोधात महिनाभर तीव्र आंदोलन केले होते. या आंदोलनाला देशभरातून समर्थन मिळाले होते. याची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते.
सरकारच्या कथनी आणि करणीमध्ये फरक दिसला – प्रियंका गांधी
काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी निकालानंतर मोदी सरकारवर कडाडून टीका केली. त्या म्हणाल्या, एकीकडे महिला सबलीकरण, महिला आरक्षणाच्या गोष्टी सरकार करते. पण हे दावे सरकारच्या कामातून दिसत नाहीत. सरकारच्या कथनी आणि करणीमध्ये फरक स्पष्टपणे समोर आला आहे.
संपूर्ण यंत्रणा बृजभूषणच्या पाठीशी होती – विनेश फोगाट
न्यायालयाच्या निकालानंतर दुःख व्यक्त करताना कुस्तीपटू विनेश फोगाट म्हणाली की, सत्ताधाऱ्याच्या एका बाहुबली नेत्याच्या विरोधात रस्त्यावर उतरण्यासाठी आणि गुन्हे दाखल करण्यासाठी आम्हाला खूप हिंमत दाखवावी लागली. सत्ता आणि बळाच्या जोरावर बृजभूषणने अनेक मुलींवर दबाव टाकून त्यांची नावे तक्रारीतून मागे घेण्यास भाग पाडले. तरीही अनेक महिला कुस्तीपटूंनी खंबीरपणे न्यायालयात लढा दिला. मात्र, पहिल्या दिवसापासूनच सरकार आणि संपूर्ण यंत्रणा बृजभूषण यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होती, असा आरोप विनेश फोगाटने केला.
उच्च न्यायालयात जाणार – बजरंग पुनिया
बृजभूषण सिंह यांना निर्दोष मुक्त केल्यानंतर कुस्तीपटू बजरंग पुनिया याने नाराजी व्यक्त केली. ते म्हणाला, की आम्ही निकालाशी सहमत नाही. संपूर्ण ताकत त्यांच्याचकडे आहे, हे आजच्या निर्णयानंतर स्पष्ट झाले. त्यांनी साक्षीदारांना पह्डले. कशाच्या आधारे त्यांना निर्दोष मुक्त केले, हेच कळत नाही. न्यायालयाचा सविस्तर आदेश लवकरच मिळेल. त्यानंतर आम्ही उच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान देणार आहोत, असे बजरंग पुनिया याने स्पष्ट केले.



























































