मुंबई मराठी पत्रकार संघाच्या क्रीडा पुरस्कारांची घोषणा; रणजित दळवी, सुनील लवाटे, जान्हवी मुळे आणि स्वदेश घाणेकर यांचा होणार गौरव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई मराठी पत्रकार संघाच्यावतीने क्रीडा पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱया पत्रकारांना दरवर्षी प्रदान करण्यात येणाऱया क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा 2025 आणि 2026 या दोन वर्षांसाठी ज्येष्ठ आणि युवा अशा दोन गटांतील चार पत्रकारांची पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे.

महेश बोभाटे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार 2025 ज्येष्ठ क्रीडा पत्रकार रणजित दळवी यांना, तर 2026चा पुरस्कार सुनील लवाटे यांना जाहीर करण्यात आला आहे. युवा क्रीडा पत्रकारांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी देण्यात येणारा आत्माराम मोरे युवा क्रीडा पत्रकार पुरस्कार 2025 बीबीसीच्या जान्हवी मुळे यांना, तर 2026चा पुरस्कार स्वदेश घाणेकर यांना जाहीर करण्यात आला आहे.

प्रत्येक पुरस्काराचे स्वरूप रुपये 10 हजार रोख, गौरवचिन्ह आणि सन्मानपत्र असे आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाला 84 वर्षांची समृद्ध परंपरा असून पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्याची परंपरा संघाने सातत्याने जपली आहे. त्याचाच एक भाग म्हणून क्रीडा पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाची दखल घेण्यासाठी संघातर्फे क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतात, असे पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी सांगितले.