
चेंबूर जिमखान्याच्यावतीने आणि महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आणि मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेच्या मान्यतेने आयोजित केलेल्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या प्रशांत मोरेने विजेतेपद पटकावले. प्रशांतने अनुभवी माजी राष्ट्रीय विजेत्या संजय मांडेला 25-7, 25-10 असे सरळ दोन सेटमध्ये पराभूत करून विजय संपादन केला. तिसऱया क्रमांकासाठी झालेल्या लढतीत ठाण्याच्या पंकज पवारने मुंबईच्या राहुल सोलंकीला 25-15, 25-22 असे नमवले. तत्पूर्वी उपांत्य फेरीत मुंबईच्या संजय मांडेने ठाण्याच्या पंकज पवारवर 23-17, 24-15 व मुंबईच्या प्रशांत मोरेने मुंबईच्या राहुल सोलंकीवर 25-19, 25-10 अशी मात केली होती.
महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात ठाण्याची मधुरा देवळेने रत्नागिरीच्या आकांक्षा कदमवर सरळ दोन सेटमध्ये 24-18, 25-6 असा विजय मिळवला. तर तिसऱया क्रमांकाच्या लढतीत मुंबईच्या प्राजक्ता नारायणकरने मुंबईच्या मैत्रेयी गोगटेवर 16-17, 20-15 व 22-15 असा विजय मिळवला. अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी आकांक्षा कदमने तीन सेटमध्ये प्राजक्ता नारायणाचा 0-25, 22-20 व 23-11 तर मधुरा देवळेने तीन सेटनंतर मैत्रेयी गोगटेचा 8-23, 23-4 व 25-0 असा विजय मिळवला होता.
विजेत्या खेळाडूंना जिमखान्याचे अध्यक्ष सुरिंदर शर्मा, उपाध्यक्ष श्याम अगरवाल, सचिव रणजित धामी, सहसचिव पी.एम. बाला, कॅरम आणि बुद्धिबळ विभागाचे सचिव बाळकृष्ण परब, स्पर्धेचे प्रायोजक एन.एल. गुप्ता, महाराष्ट्र कॅरमचे उपाध्यक्ष यतिन ठाकूर, मानद सचिव अरुण केदार, खजिनदार अजित सावंत, सहसचिव केतन चिखले व मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेचे कार्याध्यक्ष संतोष चव्हाण यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.




























































