
वडिलांच्या बदलीसाठी आईचे दागिने विकून जमा केलेले तीन लाख रुपये गमावल्याने ते पैसे भरून काढण्यासाठी २४ वर्षीय सुशिक्षित तरुणाने चोरीचा मार्ग अवलंबल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत उमरेड येथून आरोपीला अटक करून त्याच्याकडून ५७ हजारांची रोकड जप्त केली. प्रथम प्रभाकर दडमल अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. चंद्रपूर येथील टाटा शोरूममधील गोदरेज डिजिटल लॉकरचा युनिक कोड वापरून १ लाख ८ हजार रुपयांची रोकड चोरी करण्यात आली. लॉकरची कोणतीही तोडफोड न करता चोरी झाल्याने पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. cctv फुटेज आणि संशयास्पद वाहनाच्या आधारे पोलिसांनी प्रथम दडमलपर्यंत धागेदोरे पोहोचवले.
चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीचे वडील नागपूर येथील निबंधक कार्यालयात कार्यरत आहेत. त्यांच्या बदलीसाठी आईचे दागिने विकून तीन लाख रुपये जमा करण्यात आले होते. हे पैसे बँकेत जमा करण्यासाठी प्रथमकडे देण्यात आले होते. मात्र, ते पैसे त्याच्याकडून हरवल्यानंतर घरच्यांच्या भीतीने त्याने ही बाब लपवली. पैसे परत मिळवण्यासाठी त्याने पूर्वीच्या नोकरीदरम्यान मिळालेल्या तांत्रिक माहितीचा वापर करून शोरूममधील डिजिटल लॉक उघडत चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक करीत आहे.



























































